Vijayalakshmi music is a non-stop concert! | विजयालक्ष्मीच्या संगीताची नॉन-स्टॉप मैफल!

नियतीने अन्याय केलेल्या काही व्यक्ती कित्येकदा सर्वसामान्य माणसांनाही लाजवेल असं काम करतात. ‘वायकोम विजयालक्ष्मी’ हे एक असं नाव आहे, जिने अंधत्वावर मात करीत संगीतसाधना केली आहे. दैवी देणगी लाभलेल्या विजयालक्ष्मीच्या नॉन-स्टॉप संगीताचा अनुभव घेण्याची संधी मुंबईकरांना लाभली आहे.

 

रविवार, दिनांक १७ जून रोजी चेंबूर येथील शिवस्वामी ऑडीटोरियममध्ये ही मैफल रंगणार आहे. हिंदी, मराठी, पंजाबी, तेलुगू कन्नड, तमिळ भाषेत आणि मोहम्मद रफी, किशोरकुमार, मुकेश, दिलेर मेहंदी, लताजी, के एस चित्रा यांची मल्याळममधील गाणी या कार्यक्रमात ती सादर करणार आहे.  सायंकाळी ४:३० ते ९:३० या वेळेत सलग पाच तास विजयलक्ष्मी आपल्या संगीताद्वारे उपस्थितांवर मोहिनी घालणार आहे. जागतिक विक्रमानंतर विजयालक्ष्मीचा प्रेक्षकांसाठीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. राज्याचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोदजी तावडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. आनंद सहस्रबुद्धे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत.

 

विजयालक्ष्मीने जग पाहिलं नसलं तरी संगीत जगतात आपला एक अनोखा विक्रम केला आहे. गायत्री वीणा वादनात पारंगत असलेल्या विजयालक्ष्मीने आजवर देशातील विविध भागांमध्ये संगीताचे शोज् केले आहेत. केरळमध्ये जन्मलेल्या विजयालक्ष्मीने संगीत प्रशिक्षण आणि संगीतसाधनेसाठी चेन्नई गाठली. इथूनच तिच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली. विजयालक्ष्मीने ‘काट्टे काट्टे’ या मल्याळम सिनेमातील गाण्यातही परफॉर्म केलं आहे. यासोबतच विजयालक्ष्मीने आजवर एकूण २० सिनेमांमधील जवळजवळ ४० गाण्यांसाठी परफॉर्म केलं आहे. यात मल्याळमसह तमिळ, संस्कृत, तेलगू आणि कन्नड या चार भाषांमधील सिनेमांचा समावेश आहे.

 

शिवस्वामी ऑडीटोरियम, फाइन आर्ट कल्चरल सेंटर, आर. सी. मार्ग, चेंबूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या कार्यक्रमाचे प्रवेश पासेस देण्यात येणार आहेत. ग्रुप बुकिंगसाठी ९५६१७९५७०४, तर ऑनलाईन बुकींगसाठी ‘तिकिट्स डॉट कॉमवर’ इच्छुकांना बुकिंग करता येईल. या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त संगीतप्रेमींनी हजेरी लावावी यासाठी तिकिटांच्या होम डिलीव्हरीचीही सोय करण्यात आली आहे. यासाठी ८१०८८७१७९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे.
Web Title: Vijayalakshmi music is a non-stop concert!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.