veteran actor Kishor Pradhan passes away cremation tomorrow | ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

ठळक मुद्देकिशोर प्रधान गेल्या १२ दिवसांपासून न्यूमोनियाने होते आजारी किशोर प्रधान यांच्या पार्थिवावर उद्या (ता.१३) सांताक्रुज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार

मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे शनिवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा प्रधान असा परीवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता.१३) सांताक्रुज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
किशोर प्रधान गेल्या १२ दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होते. त्यात त्यांच्या हृदयावर ताण जाणवत असल्याने त्यांना अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये किशोर प्रधान यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन घराण्यात झाला. त्यांच्या आई मालतीबाई प्रधान यांना नाटकांची आवड होती. ४० च्या दशकात त्या नाटकातून काम करायच्या. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले. किशोर प्रधान यांनी नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस)मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवली होती.
किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धामधून अनेक एकांकिका व नाटकांमधून कामे केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली. ग्लॅक्सो कंपनीत नोकरी करीत असताना नाटकाच्या आवडीतून त्यांनी बांद्रा येथील एम‍आय‍जी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकप्रेमींना घेऊन नटराज ही नाट्यसंस्था काढली आणि तीन चोक तेरा हे नाटक बसवायचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित कल्पनेचा खेळ हे नाटक बसवून सादर केले. पुरुषोत्तम दारव्हेकर हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक खूप गाजले. भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. किशोर प्रधान यांनी १८हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत. ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. 
याच दरम्यान त्यांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली. पण त्यावेळी मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचे. तसेच ते सलग काही दिवस असल्यामुळे नोकरीतून रजा घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यांनी तेव्हा चित्रपटात
काम करण्याला प्राधान्य दिले नाही. मात्र रिटायर झाल्यानंतर त्यांनी काही चित्रपटात काम केले. ‘मामा भाचे’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’ या चित्रपटात त्यांनी काम केले. तसेच हिंदी चित्रपट ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये त्यांनी साकारलेला ‘खटयाळ म्हातारा’च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. ‘जब वी मेट’मधील स्टेशन मास्तरची भूमिकादेखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. दूरदर्शन वाहिनीवरील गजरा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता. 
 


Web Title: veteran actor Kishor Pradhan passes away cremation tomorrow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.