ठळक मुद्देआगामी 'बाळा' या चित्रपटातही क्रिकेटवेड्या बाळाची आणि त्याच्या निर्धाराची, स्वप्नांची गोष्ट उलगडणार आहे.

क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी म्हणजे भारतीयांचे जिव्हाळ्याचे विषय आणि त्या दोन्ही एकत्र येणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. हा योग ‘बाळा’ या मराठी चित्रपटाने जुळून आणला आहे. या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेकजण असतील. मात्र त्याला आपल्या निर्धाराची जोड देत ती पूर्ण करणारे फार कमी असतात. आगामी 'बाळा' या चित्रपटातही क्रिकेटवेड्या बाळाची आणि त्याच्या निर्धाराची, स्वप्नांची गोष्ट उलगडणार आहे. ३ मे ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा तसेच यशवर्धन–राजवर्धन, आशिष गोखले, ज्योती तायडे हे सहकलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.  

हा सिनेमा फक्त क्रिकेटवर आधारलेला नसून स्वप्न उराशी बाळगून, त्या मार्गाने प्रयत्न करणाऱ्या एका जिद्दी मुलाची कथा सांगतो. ‘स्वप्न पहाणाऱ्यांना ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास हा चित्रपट नक्कीच देईल’, असा विश्वास दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. विजय गमरे यांनी लिहिलेल्या गीतांना महेश-राकेश यांनी संगीत दिले आहे. ‘लाडल्या रे लाडल्या’, ‘विठ्ठला’, ‘दिमाग ढिला’, ‘जिंकूया खेळूया’ ‘हल्ला गुल्ला’ अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गाणी या चित्रपटात आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अजय सिंग यांनी सांभाळली आहे. छायांकन आर.आर. प्रिन्स तर संकलन अभिजीत कुंदार यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन विष्णू देवा, हबीबा रेहमान, फुलवा खामकर यांनी केले आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे. ३ मे ला ‘बाळा’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.


Web Title: upendra limaye and Kranti Redkar in bala marathi movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.