The unique invention of songs and music will be played in Vijaya Dashami | विजयादशमीला रंगणार गीत-संगीत-नृत्याचा अनोखा अविष्कार

गीत रामायणाच्या सांगीतिक प्रतिभेचा ठेवा म्हणजे प्रत्येकाच्या मर्मबंधातील ठेव. मराठी मनाच्या भावविश्वाचा मोठा भाग ‘गीत रामायणा’ने व्यापला आहे. गीतकार ग.दि माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झालेल्या या कलाकृतीबद्दल 'कृतज्ञता' हा एकच भाव व्यापून उरतो. या कृतज्ञतेपोटीच‘रमेश देव प्रोडक्शन प्रा.लि.’ व ‘सुबक’ यांनी पुढाकार घेत ‘नृत्य-सजीव गीत रामायण’या कार्यक्रमाच्या निर्मीतीचं शिवधनुष्य उचललं आहे. येत्या ३० सप्टेंबरला विजयादशमीच्या दिवशी ‘नृत्य-सजीव गीत रामायणाचा नेत्रदिपक सोहळा मुंबईत रंगणार आहे. अनेक दिग्गज कलाकार, गायक व वादकांना घेऊन तसेच गीत–नृत्याचा अनोखा संगम साधत ‘नृत्य-सजीव गीत रामायणा’चा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. 

मराठी भाषेतील वाङ्मयीन व सांगीतिक कलाकृतींमध्ये ‘गीत रामायणा’चे स्थान अग्रस्थानी आहे. ह्या महाकाव्याचा थक्क करणारा प्रवास आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं भाग्य आम्हाला मिळालं याबद्दल समाधान व्यक्त करत ‘नृत्य-सजीव गीत रामायण’आजच्या पिढीला निश्चितच भावेल, असा विश्वास दिग्दर्शक अभिनय देव व अभिनेता अजिंक्य देव यांनी व्यक्त केला. मराठीतील हे सांस्कृतिक वैभव रसिकांसमोर आले पाहिजे या उद्देशाने या अनोख्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी आवर्जून पुढाकार घेतल्याचं सुनील बर्वे यांनी सांगितले. रामायणातील प्रमुख पात्रांचे स्वभाव विशेष, त्यांचे परस्परसंबंध, राग, लोभ, हर्ष, खेद या सर्व भावना या गीतांतून प्रकट होतात. या काव्यानुभवाची स्वत:ची एक चित्रभाषा देखील आहे. ती आजच्या पिढीला कळावी यासाठी‘नृत्य-सजीव गीत रामायण’खूप महत्त्वाचं असल्याचं मत नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी व्यक्त केलं. या अनोख्या संकल्पनेचे कौतुक करत ‘नृत्य-सजीव गीत रामायणा’च्या यशाकरिता ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

Web Title: The unique invention of songs and music will be played in Vijaya Dashami
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.