Taken on Vikram Gokhale and Suhasini Muliya, Goddess Ganesh Geet | विक्रम गोखले आणि ​सुहासिनी मुळ्ये यांच्यावर चित्रीत केले गेले देव देव्हाऱ्यात नाहीमधील गणेशगीत

आज केवळ महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.गणपती बाप्पावरील अनेक गीते या काळात आपल्याला ऐकायला मिळतात. चित्रपटांमध्ये दरवर्षी गणपती बाप्पावर नवनवीन गाणी येतच असतात. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणतं नवं गीत ऐकायला मिळणार याची उत्सुकता गणेशभक्तांनाही लागलेली असते. कोणत्याही शुभकार्यात आद्य पूजनीय असलेल्या गणेशाची महती वर्णन करणारे ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटातील भक्तीरसाने भारलेलं गणेशगीत यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाले आहे. ऑडबॉल मोशन पिक्चर्स तर्फे नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
गणेशाचं स्वागत करणाऱ्या देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटातील ‘आला आला आला आला...’ हे गीत लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे. अर्थपूर्ण शब्दरचना आणि सुमधूर संगीताच्या जोडीला नेत्रसुखद छायाचित्रण ही या गणेशगीताची खास वैशिष्ट्ये असणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांच्यासह देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटातील इतर कलावंतांवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये हे चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
गीतकार बाबा चव्हाण यांनी लिहिलेल्या या गीताला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. या गणेशगीतात प्रेक्षकांना मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचे दर्शन घडणार आहे. सहजसुंदर शब्दांना साजेसं संगीत आणि त्याला अनुसरून करण्यात आलेलं चित्रीकरण हा या गीताचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. यामुळेच या गाण्यात परफॉर्म करताना गणेशभक्तीत न्हाऊन निघाल्यासारखे वाटले अशी भावना विक्रम गोखले यांनी व्यक्त केली. सुहासिनी मुळ्ये यांच्या म्हणण्यानुसार हे गीत आबालवृद्धांना ताल धरायला लावणारे आहे.
या गाण्याद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चाळ संस्कृतीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचा आनंद अनुभवता येईल असे देव देव्हाऱ्यात नाही चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी नावीन्यपूर्ण कोरिओग्राफीचा साज चढवत हे गाणे नेत्रसुखद बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आशिष देव यांचे आहेत.
Web Title: Taken on Vikram Gokhale and Suhasini Muliya, Goddess Ganesh Geet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.