Swapnil Joshi is going to be seen in the website soon | स्वप्निल जोशी सांगतोय, लवकरच वेबसिरिजमध्ये झळकणार

स्वप्नील जोशीने आज त्याच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याला लाल इश्क या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नुकतेच दादासाहेब फाळके फाऊंडेशन अॅवॉर्डने गौरवण्यात आले. त्याचा हा तिसरा दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन अॅवॉर्ड असून त्याला मिळालेल्या या यशाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

स्वप्निल दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुझे अभिनंदन. आज तुला मराठीतील सुपरस्टार मानले जाते. तुझ्यासाठी पुरस्कार हे किती महत्त्वाचे आहेत?
पुरस्कार म्हणजे शाबासकी. पुरस्कार म्हणजे तुम्ही केलेल्या कामाची घेतली गेलेली दखल असे मी मानतो. तुम्हाला पुरस्कार मिळतो म्हणजे एक प्रकारे तुमच्या कामाचे कौतुक केले जाते असे मला वाटते. आपले एखाद्याने कौतुक केलेले सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे माझ्यासाठी पुरस्कार हे खास आहेत आणि त्यात दादासाहेब फाळके या नावामध्येच एक आदर आहे. त्यामुऴे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे यात एक वेगळाच आनंद आहे. त्यामुळे दादासाहेब फाळके फाऊंडेशन पुरस्कार माझ्यासाठी खूपच खास आहे. 

हा पुरस्कार मिळाल्यानंतर तू सेलिब्रेशन कशाप्रकारे केलेस?
इतका मोठा पुरस्कार मिळाला याचा मला नक्कीच आनंद आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर मी घरी गेलो. आईवडिलांच्या, देवाच्या पाया पडलो. माझ्यासाठी सेलिब्रेशन हे इतकेच होते. कारण कोणत्याही पुरस्कारात रमून जाऊ नये असे मला स्वतःला वाटते. कौतुक हे नक्कीच गरजेचे असते. पण त्यात रमणारा मी नाही. मी दुसऱ्या दिवशीपासून अधिक उमेदीने पुन्हा कामाला सुरुवात केली.

आज मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्यांपैकी तू एक आहेस, आज इतक्या वर्षांनी चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करतोस?
माझ्यासाठी चित्रपटाची कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते. त्यानंतर चित्रपटाचे सेट अप काय आहे हे मी विचारतो. तसेच चित्रपटात सहकलाकार कोण आहेत हे महत्त्वाचे असते आणि सगळ्यात शेवटी माझ्याकडे वेळ आहे की नाही याचा मी विचार करतो. पण माझ्यासाठी चित्रपटाची कथा हीच सगळ्यात महत्त्वाची असते.

आज मराठी, हिंदी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार वेबसिरिजमध्ये काम करत आहेत. वेबसिरिजमध्ये काम करण्याचा तुझा काही विचार आहे का?
मला अनेकजण वेबसिरिजसाठी विचारत आहेत. पण मला ऑफर करण्यात आलेल्या वेबसिरिजमधील कोणतीच वेबसिरिज मला इंटरेस्टिंग वाटली नाही. एखादा चांगला विषय असेल तर मला बेवसिरिज करायला नक्कीच आवडेल. वेबसिरिज हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर असल्याने त्याला कसलेच बंधन नसते. त्यामुळे एखादी उत्तम वेबसिरिज आली तर मी नक्की करेन.

Web Title: Swapnil Joshi is going to be seen in the website soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.