Swapnil Joshi and his wife Lina Joshi launch the title song 'You Will not Know' | ​स्वप्निल जोशी आणि त्याची पत्नी लीना जोशीने केले 'तुला कळणार नाही' सिनेमाचे टायटल साँग लाँच

नवरा-बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तिखटपणादेखील असतो. संसारातील स्वानुभवातून तयार झालेले हे रसायन इतरांना कळेलच असे नाही! अशा या गोंडस नात्याची गुजगोष्ट मांडणारा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमाच्या पोस्टरचे आणि शीर्षक गीताचे अनावरण करण्यात आले. 
वैवाहिक दाम्पत्यांवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत स्वप्निल आणि लीना या जोशी दाम्पत्यांनी सिनेमाचे शीर्षक गीत लाँच केले. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा पोस्टरदेखील यावेळी सादर करण्यात आला. 'मोडीत निघालेल्या ओढीची... गोष्ट वेड्या जोडीची...' असे सबटायटल असलेल्या या पोस्टरवर सुबोध आणि सोनालीला बांधले असल्याचे दिसून येत असून प्रत्येक घराघरातील नवरा बायकोची केमिस्ट्री आपल्याला यात पाहायला मिळतेय. या सिनेमाच्या शीर्षकगीतामध्येदेखील हीच केमिस्ट्री दिसून येतेय. रोमँटिक बाज असलेल्या या शीर्षकगीताचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून संगीतदिग्दर्शन अमितराज यांनी केले आहे. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी हे गाणे गायले आहे. नवरा-बायकोच्या नात्यातील अबोल प्रेम दाखवणारे हे गाणे विवाहित दाम्पत्यांसाठी खास असणार आहे. 
विशेष म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवातच सुबोध आणि सोनालीच्या जुगलबंदीने झाली. नवरा बायकोत उडणारे हलके फुलके खटके अगदी गमतीदार पद्धतीने मांडत त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सिनेमाद्वारे स्वप्निल जोशी निर्मात्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. श्रेया योगेश कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांची निर्मिती आणि निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास येत आहे. 

Also Read : सुबोध भावे का म्हणतोय ‘तुला कळणार नाही’?

Web Title: Swapnil Joshi and his wife Lina Joshi launch the title song 'You Will not Know'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.