The story of Ghat is directed by director Raj Gorday | दिग्दर्शक राज गोरडे यांना अशी सुचली घाटची कथा

एखादा लहानसा मुद्दा घेऊनही त्यावर वास्तववादी सिनेमा बनवत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न काही निर्माते-दिग्दर्शक नेहमीच करत आले आहेत. काही निर्माता-दिग्दर्शकांना तर पदार्पणापासूनच अनोख्या कथानकाद्वारे रुपेरी पडद्यावर वास्तव दाखवण्याची संधी मिळते. नवोदित दिग्दर्शक राज गोरडे आणि निर्माते सचिन जरे या जोडगोळीनेही ‘घाट’ या आपल्या पहिल्या चित्रपटात एक धाडसी पाऊल उचलत तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. १५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आळंदीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाची कथा पाहायला मिळेल.
सचिन जरे आणि राज गोरडे यांनी वेगळया दृष्टिकोनातून समाजातील सत्य परिस्थिती मोठ्या पडद्यावर उतरवली आहे. सचिन यांनी जरे एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली ‘घाट’ची निर्मिती केली असून दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारीही राज यांनी सांभाळली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत राहण्याचा योग आला आणि त्यांनी ‘घाट’ची कथा कागदावर उतरवली. प्रवाहापेक्षा वेगळं कथानक असल्याने बऱ्याच निर्मात्यांनी नकार दिला, पण सचिन जरे यांनी या चित्रपटाच्या कथेतील गांभीर्य ओळखलं आणि राज यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत ‘घाट’ मोठ्या पडद्यावर चितारण्यास सहकार्य केलं. आळंदीमध्ये राहत असताना ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात तिथल्या दुर्लक्षित घटकांकडे लक्ष वेधलं गेलं आणि ‘घाट’ची संकल्पना सुचल्याचे सांगत राज म्हणाले की, विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आज असंख्य कुटुंबं आपली उपजीविका करीत आहेत. आळंदीमधील इंद्रायणीच्या घाटावरही अशा कुटुंबांची संख्या खूप मोठी आहे. इथली परिस्थिती पाहिल्यावर उद्विग्न मनाने इंद्रायणीच्या घाटावर बसलो असताना माझ्या मागे बसलेल्या दोन मुलांच्या संभाषणातून चित्रपटाचा विषय सुचला. इथली मुले पैसे कमावण्यासाठी बरेच काही करतात. कुणी गंध लावतं, तर कुणी नदीच्या पाण्यात लोखंडी चाळण मारून सुट्टे पैसे म्हणजेच चिल्लर गोळा करतं... कुणी हार विकतं, तर कुणी साखरफुटाणे-बुक्का विकतं... पण काही मुलं याहीपेक्षा काहीतरी वेगळं करून पैसे कमावतात. या चित्रपटात अशाच मुलांची आणि त्यांच्या आईवडिलांची हृद्यस्पर्शी कथा मांडली आहे.
राज गोरडे यांना ‘घाट’साठी खूप धक्के सहन करावे लागले. आशयघन कथानक, दिग्गज कलावंत, कुशल तंत्रज्ञ आणि उत्तम सादरीकरणाची क्षमता असूनही ‘घाट’ची सुरुवात काही होत नव्हती. अशातच निर्माते सचिन जरे यांनी पुढाकार घेत ‘घाट’ची निर्मिती केली. याबद्दल बोलताना सचिन जरे सांगतात की, ‘घाट’ हा चित्रपट म्हणजे जीवनातील वास्तवतेचे दर्शन घडवणारा आहे. नवोदित दिग्दर्शक राज गोरडे याचा प्रामणिक प्रयत्न मला भावला. तसेच आळंदी-पंढरपूर म्हटले की केवळ वारी, वारकरी आणि त्यांची भक्ती असाच अनेकांचा समज होतो. तिथल्या वास्तवाकडे पाहण्याची डोळस नजर सर्वांकडे नाही. हेच काम ‘घाट’च्या माध्यमातून करता येईल या उद्देशाने मी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला.
यश कुलकर्णी, दत्तात्रेय धर्मे, मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये वारी तसंच आळंदी-पंढरपूरचे दर्शन घडवणाऱ्या छायालेखक अमोल गोळे यांनी ‘घाट’चे छायांकन केले आहे. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर सागर वंजारी संकलक आहेत. १५ डिसेंबरला ‘घाट’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Also Read : आईने केलेल्या विनवणींमुळे या कलाकाराला मिळाली घाट या चित्रपटात काम करण्याची संधी

Web Title: The story of Ghat is directed by director Raj Gorday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.