Soon a movie based on Lover Story: Sameer Patil | लवकरच लव्हस्टोरीवर आधारित चित्रपट करणारः समीर पाटील

शेंटिमेंटल या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे अशोक सराफ वर्षभरानंतर आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील यांच्याशी मारलेल्या गप्पा...

अशोक सराफ गेल्या काही वर्षांपासून खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करत आहेत. शेंटिमेंटल या चित्रपटात काम करण्यासाठी तुम्ही त्यांना कसे तयार केले?
मी शेंटिमेंटल या चित्रपटाची कथा लिहिली होती. मला मुंबई-पूणे प्रवासात टॅक्सीत एक सहप्रवासी भेटला होता. तो हवालदार होता. त्याच्याशी गप्पा मारतानाच मला ही कथा सुचली. ती कथा घेऊन मी त्यांच्याकडे गेलो तर मी तुझ्या चित्रपटात काम का करावे हा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला. त्यांच्या घरातील एका कोपऱ्यात अनेक फायली पडल्या होत्या. त्या मला दाखवत माझ्याकडे इतक्या चित्रपटाच्या पटकथा आहेत असे त्यांनी मला सांगितले. त्यावर तुम्ही एकदा कथा वाचा तुम्हाला कथा नाही आवडली तर या गठ्ठ्यात माझी फाईल ठेवून द्या असे त्यांना मी सांगितले. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी मी त्यांना कॉल केला. पण मला त्यावेळी देखील त्यांनी मला होकारार्थी उत्तर कळवले नाही. त्यानंतर दोन दिवसांनी मला चित्रपटासाठी होकार दिला.

अशोक सराफ यांनी होकार दिल्यानंतर पुढचा प्रवास कसा होता?
अशोक सराफ यांच्यानंतर मी उपेंद्र लिमयेंसोबत बोललो. त्याला ही कथा खूपच रंजक वाटली. त्यानंतर इतर कलाकारांच्या मी ऑडिशन घेतल्या आणि त्यानंतर केवळ तीन महिन्यात आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः इंजिनिअरचा विद्यार्थी आहे आणि या चित्रपटातील निर्मात्यांपैकी अनेक जण देखील इंजिनिअर आहेत. त्यामुळे अनेक इंजिनिअर लोकांनी एकत्र येऊन हा चित्रपट बनवला आहे असे मी सांगतो.

तुम्ही पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल सारखे सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे चित्रपट आजपर्यंत दिग्दर्शित केले आहेत, सध्या प्रेमकथेवरील चित्रपटांचा जमाना आहे, एखादी लव्हस्टोरी करण्याचे तुमच्या डोक्यात आहे का?
मला कित्येक दिवसांपासून एखाद्या लव्ह स्टोरीवर चित्रपट करायचा आहे. माझ्या डोक्यात काही कथा देखील आहेत. त्यामुळे भविष्यात मी एखाद्या लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपट नक्कीच बनवेन. 

एक दिग्दर्शक म्हणून चित्रपट बनवणे सोपे वाटते की त्याचे प्रमोशन करणे...
आजच्या मार्केटिंगच्या दुनियेत चित्रपटांचे प्रमोशन करण्यापेक्षा चित्रपट बनवणे हे सोपे आहे. चित्रपट बनवायला नक्कीच मेहनत घ्यावी लागते. पण त्यापेक्षा अधिक कष्ट हे प्रमोशनसाठी करावे लागते. ​
Web Title: Soon a movie based on Lover Story: Sameer Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.