Shivani Rangole says, do not be afraid of the distorted commentary on social media | शिवानी रांगोळे सांगतेय,सोशल मीडियावरील विकृत कमेंटला घाबरु नका

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रत्येक जण आपापली मतं मांडत असतो. व्यक्त होत असतो. आता तर व्यक्त होण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट सारखं माध्यम आहे. मात्र याच माध्यमातून ब-याचदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक तर होत नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. सोशल नेटवर्किंग साईटवर कुणीही कोणाबाबतही वाट्टेल ते कमेंट करत असल्याचे पाहायला मिळते. काही जण त्या कमेंटला उत्तर देतात तर काही जण कमेंट डिलीट करुन विषय टाळणं सोयीचं समजतात. असाच एक मुद्दा काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने चर्चेत आणला. हा मुद्दा म्हणजे बॉडी शेमिंगचा. अभिनयच्या क्षेत्रात वावरत असल्याने शिवानी सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. फॅन्ससोबत संवाद साधता यावा, त्यांच्याशी कनेक्ट होता यावं यासाठी तिने आपली अकाऊंट्स प्राईव्हेट ठेवली नाही. तिला कुणीही सहज फॉलो करु शकतं. मात्र याचाच गैरफायदा काहीजण सोशल मीडियावर घेत असल्याचे शिवानीच्या लक्षात आले. बारीक हो, पोट झाक, अशा अनेक कमेंट्स तिच्याबाबत सोशल मीडियावरील तिच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आल्या. त्यामुळे संतापलेल्या शिवानीने बॉडी शेमिंगविरोधात आवाज उचलला. महिला दिनाच्या दिवशी 'शेव्ह युअर ओपिनियन' हा हॅशटॅग वापरत इंस्टाग्रामवर तिने एक फोटो टाकला. एकप्रकारे त्यातून बॉडी शेमिंगविरुद्ध शिवानीने स्वतःची भूमिका मांडली. त्यावरही आक्षेपार्ह कमेंट्स आल्या. मात्र शिवानीने त्या डिलीट केल्या नाहीत. या सगळ्या कॅम्पेनमध्ये तिला तिच्या मित्रांची साथ लाभली. त्यांच्या प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे बळ दिल्याचे शिवानीने सांगितले. सोशल मीडियावर फोटोवर कुणी वाईट किंवा अश्लील कमेंट टाकली की ती सामान्यपणे डिलीट केली जाते. विशेष म्हणजे मुलींबाबत अशा गोष्टी जास्त घडतात. मात्र त्यांनाही शिवानीने एक संदेश दिला आहे. ती सांगते कमेंट का डिलीट करायच्या. त्या तशाच राहू द्या. कारण त्यातून कमेंट देणा-याची विकृत मानसिकता दिसते. ती कमेंट डिलीट केल्याने असे प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे कमेंट डिलीट करु नका असे शिवानीने सांगितले आहे. या सगळ्या प्रकाराला धैर्याने सामोरं जाण्याचा सल्लाही ती देते. सध्या तर सोशल नेटवर्किंग साईट्वर रिपोर्ट ऍस स्पॅम, ब्लॉक असे बरेच ऑप्शन आले आहेत. त्यामुळे अश्लील कमेंट करणा-याला तीन जणांनी रिपोर्ट केलं तर ते अकाऊंट ब्लॉक केलं जाते. त्यामुळे बॉडी शेमिंग आणि कमेंटला घाबरु नका असा सल्ला शिवानी देते. सायबर सुरक्षा नावाचे प्रमुख्य अस्त्रही आपल्या हातात असल्याची आठवण करुन देत न घाबरण्याचा सल्लाही तिने दिला आहे.
Web Title: Shivani Rangole says, do not be afraid of the distorted commentary on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.