Shibu-Abhijit 'collected' for 'Chagi' once again | शिबू-अभिजीत ‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र

चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची जोडी जमते तशी काही कलाकार आणि दिग्दर्शकांचीही जमते. मराठी सिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासावर सहज जरी नजर मारली तरी या गोष्टीची जाणीव होते. अशीच एक कलाकार-दिग्दर्शकाची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या छोटया पडद्यावर गाजत असलेला अभिनेता-दिग्दर्शक अभिजीत साटम पुन्हा एकदा मोठया पडद्याकडे वळला आहे. दिग्दर्शक शिबू म्हणजेच शिवदर्शन साबळेच्या ‘लगी तो छगी’ या आगामी मराठी सिनेमात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

शिवदर्शनच्या ‘कॅनव्हास’मध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यापूर्वा अभिजीतने हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. आता ‘लगी तो छगी’च्या निमित्ताने शिबू आणि अभिजीत पुन्हा एकत्र आले आहेत. निर्माते शिवदर्शन साबळे, अजित पाटील, दिप्ती विचारे आणि स्वाती फडतरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.‘कॅनव्हास’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ या चित्रपटांनंतर मध्यंतरीच्या काळात शॉर्टफिल्म्स आणि नाटकांमध्ये बिझी असलेला शिबू ‘लगी तो छगी’द्वारे पुन्हा एकदा मोठया पडद्याकडे वळला आहे. शिवदर्शनची खरी ओळख सांगायची तर तो सुप्रसिद्ध शाहिर साबळे यांचा नातू. आजोबा शाहिर साबळे तसेच वडिल देवदत्त साबळे ही मराठीतील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वे मागे असतानाही शिवदर्शनने आतापर्यंत स्वबळावरच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. 

अभिजीत चांगला मित्र तर आहेच, पण एक उत्तम अभिनेताही असल्याने तो या चित्रपटामधील भूमिकाअगदी प्रामाणिकपणे साकारू शकतो याची खात्री असल्यानेच त्याची या सिनेमासाठी निवड केल्याचं शिबू म्हणाला. प्रवाहापेक्षा वेगळया गोष्टी हाताळणाऱ्या शिबूने या वेळेसही कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर अशा तिन्ही जॉनरला हात घालणारा हा एक अनोखा प्रयत्न केला आहे. शिबूच्या मते प्रेक्षकांना या सिनेमाद्वारे एक वेगळा अनुभव मिळेल. दिग्दर्शनासोबतच शिवदर्शनने हेमराज साबलेंच्या साथीने या सिनेमाचं लेखनही केलं आहे. 

अभिजीतसोबत या सिनेमात निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज, शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आणि सुरेंदर पाल आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना अनुराग गोडबोले याने स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटाचं एक वैशिष्टय म्हणजे शिबूचे वडील देवदत्त साबळे यांनी 40 वर्षांपूर्वा लिहिलेलं आणि संगीतबद्धकेलेलं एक गाणं प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये ऐकायला मिळणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते कॉस्च्युम डिझाइनर सचिन लोव्हलेकर यांनी या सिनेमातील व्यक्तिरेखांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. अपूर्वा मोतीवाले-सहाय आणि आशिष म्हात्रे यांनी संकलन, तर कॅमेरामन प्रदिप खानविलकर यांनी छायालेखन केलं आहे.
Web Title: Shibu-Abhijit 'collected' for 'Chagi' once again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.