Redo's selection at Cairo and Kolkata International Film Festival along with Indian Panorama of 'Iffi' | ​'इफ्फी'मधील इंडियन पॅनोरमासह कैरो आणि कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रेडूची निवड

सागर वंजारी दिग्दर्शित रेडू या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हॅट्रिक केली आहे. प्रतिष्ठेच्या तीन चित्रपट महोत्सवांसाठी हा चित्रपट निवडला गेला आहे. त्यात इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागासह कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इजिप्तमधील कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समावेश आहे. 
नवल फिल्मचे नवल किशोर सारडा यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल, मृण्मयी सुपल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. मालवणी रूपांतर चिन्मय पाटणकर यांनी केले आहे. विजय नारायण गवंडे यांनी संगीत आणि गुरू ठाकूर, विजय नारायण गवंडे यांनी गीतलेखन केले आहे. दिग्दर्शनासह संकलनाची जबाबदारी सागर वंजारी यांनी पार पाडली आहे. तर छायांकन मंगेश गाडेकर, कला दिग्दर्शन निलेश गोरक्षे, साऊंड डिझाईन पीयुष शहा यांचे आहे. श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा आणि पूर्णिमा ओक यांनी वेशभूषा केली आहे. नेहा गुप्ता आणि रुपेश जाधव कार्यकारी निर्माते आहेत. गायक अजय गोगावले, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर यांनी गाणी गायली आहेत. 
प्रतिष्ठेच्या कैरो महोत्सवात इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विभागात रेडूची निवड झाली आहे. या विभागात निवड झालेला रेडू हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. तसेच इफ्फीसारख्या महत्त्वाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातही या चित्रपटाची निवड झाली आहे. 
सागर वंजारीने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे. पदार्पणातच मिळालेल्या यशाविषयी सागर सांगतो, 'एक उत्तम कथानक तितक्याच चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न रेडू या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.'
निर्माते नवल किशोर सारडा यांचाही चित्रपट निर्मिती करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. 'बऱ्याच वर्षांपासून चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा रेडूच्या रूपाने पूर्ण झाली. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता चांगली कलाकृती करण्याचे स्वप्न समोर ठेवूनच या चित्रपटाची निर्मिती केली. रेडूच्या तीन आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधील निवडीमुळे आमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे चीज झाले आहे,' असे नवल किशोर सारडा यांनी सांगितले.

Also Read : ​​'बंदूक्या' चित्रपटात शशांक शेंडे दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत
Web Title: Redo's selection at Cairo and Kolkata International Film Festival along with Indian Panorama of 'Iffi'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.