Ready to display 'HALAL' found in Sensor script | सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेला ‘हलाल’ प्रदर्शनासाठी सज्ज

रुळलेली वाट सोडून वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्यांची वाट नेहमीच खडतर असते. तिहेरी तलाक प्रथेचा परामर्ष घेणाऱ्या हलाल सिनेमाचा प्रवासही बराच खडतर राहिला. हलाल चा संवेदनशील विषय लक्षात घेत सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला पहिल्या फेरीतच बाद केले. सेन्सॉरच्या अडचणी कमी म्हणून की काय अनेक संघटनांच्या विरोधाचा सामनाही चित्रपटाला करावा लागला. मानवी वेदनेची ही कथा सर्वांपुढे यावी या उद्देशाने चित्रपटाच्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी अडथळ्यांची ही शर्यत पार करत हलाल च्या प्रदर्शनाचा निर्णय घेतला. अनेक महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवणारा हलाल येत्या ६ ऑकटोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.       
 
हलालचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे व अमोल कागणे यांनी केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. कथेचा आशय गडद करणारी ‘मौला मेरे मौला’, सैयां ही दोन गीते व त्याला साजेसं पार्श्वसंगीत या चित्रपटातील गीतांना लाभलं आहे. चित्रपटाची गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे, सय्यद अख्तर, विजय गटलेवार यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे.
 
अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, संजय सुगावकर, अमोल  कागणे, विमल म्हात्रे या कलाकारांच्या हलाल मध्ये भूमिका आहेत. पटकथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास, संकलन निलेश गावंड यांचं आहे. कार्यकारी निर्माते मिथिलेश सिंग राजपूत आहेत. 

ALSO READ :  हलाल चित्रपटाचा टीझर लाँच 

"मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय परिणामकारकरीत्या लोकांपर्यंत पोचवता येतो. या उद्देशानेच मुस्लीम स्त्रियांची व्यथा हलाल चित्रपटाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना निर्माते अमोल कागणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींमधून सामाजिक प्रश्नांचा माणसांच्या जगण्याचा वेध घेतला आहे. ‘समाज बदलतोय असं आपण म्हणतो पण खरंच समाज बदलतोय का? आजही अनेक समस्या व त्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. दिग्दर्शक या नात्याने या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिला असल्याचे’, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी यावेळी सांगितलं. ‘सामाजिक भान जपणाऱ्या कलाकृती समाजासमोर आवर्जून यायला हव्या असं सांगत अशा कलाकृतींमध्ये काम करायला मिळणं हे भाग्याचं असल्याचं’, मत सर्वच कलाकारांनी यावेळी व्यक्त केलं.

Web Title: Ready to display 'HALAL' found in Sensor script
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.