Ravi Jadhav's Nude film will be released on this day | या दिवशी प्रदर्शित होणार रवी जाधव यांचा न्युड हा चित्रपट
या दिवशी प्रदर्शित होणार रवी जाधव यांचा न्युड हा चित्रपट
रवी जाधव यांचा न्यूड हा चित्रपट चांगलाच वादात अडकला होता. या चित्रपटाचे नाव आणि या चित्रपटाचा विषय यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन न्यूड या चित्रपटाने होणार होते. पण ऐनवेळी चित्रपट निवड समितीच्या सदस्यांनी हा चित्रपट महोत्सवात दाखवायला नकार दिला होता. याबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची नाराजी देखील व्यक्त केली होती. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी ही गोष्ट चुकीची असल्याचे मत देखील व्यक्त केले होते. त्यानंतर एस दुर्गा या महोत्सवातून देखील हा चित्रपट काढून टाकण्यात आला होता. या चित्रपटाला न्याय मिळावा यासाठी रवी जाधव कोर्टात देखील गेले होते. रवी जाधव यांचा हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी रवी जाधव यांना पाठिंबा दिला होता. आता अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
न्युड या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट देण्यात आले होते. अभिनेत्री विद्या बालनसह ज्युरीने या चित्रपटाला स्टँडीग ओवेशन देत कौतुक केले होते. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून कोणत्याही कट्सविना हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात राजश्री देशपांडेची मुख्य भूमिका असून या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे. या चित्रपटाच्या कथेवरून देखील चांगलाच वाद रंगला होता. लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी या चित्रपटाची कथा त्यांच्या पुस्तकातून चोरली असल्याचा आरोप लावला होता. मनिषा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, मी रवी जाधव यांना कथेबाबत विचारले असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली होती. पण या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट मी लिहिलेल्या कथेवरच बेतलेला असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला या कथेचे मानधन न मिळाल्यास मी कोर्टाचे दरवाजे ठोठावेन. 
न्युड या चित्रपटाबाबत निर्माण झालेल्या वादांमुळे हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आता कसा वाटतोय हे काहीच दिवसांत कळेल. 

Also Read : अंमली पदार्थांविरोधात रवी जाधवचा एल्गार
Web Title: Ravi Jadhav's Nude film will be released on this day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.