Raidu film director Sagar Vanjari is telling about his journey | रेडू चित्रपटाचा दिग्दर्शक सागर वंजारी सांगतोय त्याच्या आजवरच्या प्रवासाविषयी

"रेडू" या चित्रपटाद्वारे सागर वंजारी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. पहिल्याच चित्रपटाला राज्य पुरस्कारासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. हा चित्रपट १८ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने सागर वंजारीशी साधलेला संवाद... 


तुझा या क्षेत्रातला प्रवास कसा सुरू झाला? 
लहानपणापासून मला तांत्रिक गोष्टींमध्ये फार उत्सुकता वाटायची. त्यातून मी अनेक उद्योग करून बघायचो. पुढे जाऊन चित्रपटाविषयी रस वाटू लागला, तेव्हा त्याच्या तांत्रिक गोष्टींमध्ये मी रमलो. त्यामुळे शॉर्टफिल्म्सचे एडिटिंग करू लागलो. गेली बारा वर्षं मी एडिटिंग करत आहे. बारा वर्षांत जवळपास १८० शॉर्टफिल्म्स एडिट केल्या. त्यातल्या ५० हून अधिक शॉर्टफिल्म्सना महोत्सवांमध्ये पुरस्कारही मिळाले. जयप्रद देसाईसारख्या दिग्दर्शकाशी शॉर्टफिल्ममुळेच परिचय झाला. 


चित्रपटांकडे कसा वळलास?
एका डॉक्युमेंटरीचं काम करताना मला एके दिवशी रत्नाकर मतकरींचा फोन आला. ते इन्व्हेस्टमेंट नावाचा चित्रपट करत होते. रत्नाकर मतकरी हे मराठी नाट्यसृष्टीतील फार मोठं नाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडून चित्रपटाचं स्क्रिप्ट मागून घेतलं. ते वाचल्यावर कळलं, की हा फार वेगळा चित्रपट आहे. मग त्याचं एडिटिंग करायला मिळालं. तो चित्रपट माझ्यासाठी लर्निंग एक्स्पिरिअन्स होता. एडिटिंगच्या पलीकडे जाऊन चित्रपट डीआय कसा होतो वगैरे सगळं तिथे शिकायला मिळाले. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या चित्रपटाने मला खूप आत्मविश्वास दिला. त्यानंतर घनचक्कर या हिंदी चित्रपटाचे मेकिंग केलं. तेलुगू, मैथिली, मराठी अशा भाषांतले चित्रपट केले. त्यानंतर मला रंगा पतंगा हा चित्रपट करायला मिळाला. त्या चित्रपटापर्यंत मला पटकथा चांगल्या रितीने समजू लागली होती. मात्र, प्रसाद नामजोशीमुळे त्यातले बारकावे कळले, सौंदर्यदृष्टी कळली. त्या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. 


दिग्दर्शन करावं असं का वाटलं?
चित्रपट क्षेत्रातल्या प्रत्येकाला कधी ना कधी आपण दिग्दर्शन करावं असं वाटत असतंच. तसं माझ्याही मनात होतं. 

"रेडू"ची निर्मिती कशी झाली? 
निर्माते नवलकिशोर सारडा चित्रपटाची पटकथा घेऊन माझ्याकडे आले. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचं लेखन केलं होतं. त्या गोष्टीतला निरागसपणा मला भावला. गोष्टीला युनिव्हर्सल अपिल होतं. चित्रपटात १९७०चा काळ आहे. त्यामुळेही तेही आव्हानच होतं. मात्र, त्याचवेळी असं वाटलं, की गोष्ट कोकणात, मालवण परिसरात घडली तर जास्त मजा येईल. त्यामुळे मी लेखक मित्र चिन्मय पाटणकरशी बोललो. चिन्मयने रंगा पतंगाची कथा लिहिली होती. तो कोकणातलाच आहे, त्याला मालवणी येते हे माहीत होतं. त्यामुळे त्याला पटकथा पाठवली आणि मालवणीत रूपांतर करण्याविषयी विचारलं. त्याने पटकथा वाचून तयारी दर्शवली. त्यातले चार-पाच सीन्स करून पाठवले. त्याने केलेले रूपांतर पहिल्याच प्रयत्नात आवडले. मग त्याने मूळ पटकथेत काही बदल केले, संवाद नव्याने लिहिले. मुळात त्याने पटकथेत मालवणी संस्कृती आणली. त्यानंतर आम्ही दोघांनी काही सीन्स लिहिले. अभिनेता शशांक शेंडे यांनीही काही गोष्टी सुचवल्या. त्यातून ही मालवणी पटकथा साकारली. मालवणी बोलीत एक गोडवा आहे, तो यात आला. कोकण म्हटले की ज्या टिपिकल गोष्टी, उदाहरणार्थ पाऊस, आंबा, दशावतार हे सगळं या चित्रपटात आम्ही टाळलं. हे सगळं करताना छाया कदम, शशांक शेंडे, चिन्मय, संगीतकार विजय गावंडे, गुरू ठाकूर या सगळ्यांचीच मदत झाली. चित्रपटाचे मालवणी रूपांतर करण्याचा निर्णय आम्ही निर्मात्याना न सांगता घेतला होता. त्यामुळे लातूरला जाऊन त्यांना चित्रपटाची पटकथा वाचून दाखवली त्यांनाही ती आवडली. त्यानंतर चित्रीकरण सुरू केलं... चित्रीकरण करतानाच लक्षात येत होतं, की काहीतरी वेगळं आणि चांगलं घडतंय. 

"रेडू"चं वेगळेपण काय?
रेडू हा मालवणी बोलीतला चित्रपट आहे. आजपर्यंत मालवणी बोलीत एखादा अपवाद वगळता फिचर फिल्म झालेली नाही. मालवणी व्यक्तिरेखा अनेक मालिका, चित्रपटांतून बघायला मिळतात. मात्र, त्या लाऊड आणि विनोदी असतात. रेडू हा चित्रपट त्या पलीकडे जातो. रेडू एका मालवणी माणसाची साधी निरागस गोष्ट सांगतो. कोकणाचा खराखुरा, निसर्गरम्य अनुभव देतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातले शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल वगळता बाकी सगळे कलाकार तिकडचेच आहेत. आज आपल्या हातात मोबाईल असतो, पण मोबाईलमध्ये भावनेपेक्षा व्यवहार जास्त असतो. पण रेडिओ हे एकेकाळी भावनेचे माध्यम होतं... 


कैरो आंतरराष्ट्रीय महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय महोत्सव, अरविंदन पुरस्कार असे मानसन्मान या चित्रपटाला मिळाले. त्या विषयी काय सांगशील?
पहिल्याच चित्रपटाला एवढे मान-सन्मान मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे. कोलकात्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. कैरोला प्रेक्षकांना प्रचंड आवडला. अनेकांनी मुद्दाम भेटून त्याबद्दल सांगितलं. त्यावेळी लक्षात आले, की आपला चित्रपट भाषेच्या पलीकडे जाऊन भावनिक स्तरावर प्रेक्षकांशी जोडला जातोय. औरंगाबाद तर प्रेक्षक अक्षरश: वेडे झाले होते. इफ्फीमध्येही तसाच अनुभव होता. 

आता तुझा पहिला चित्रपट रेडू १८ मे रोजी प्रदर्शित होतोय. प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा? 
आम्ही एक साधी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला काहीही सामाजिक प्रबोधन वगैरे करायचं नव्हतं. एका रेडिओमुळे एका माणसाचं आयुष्य कसं बदलतं हे चित्रपटात पाहायला मिळेल. रेडिओवरचा हा भारतातला दुसराच चित्रपट आहे. या पूर्वी तमीळमध्ये रेडिओपेट्टी नावाचा सुंदर चित्रपट झाला होता. कोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला रेडू नक्की आवडेल. कारण यात कोकणाचा निसर्ग आहे, तिथली माणसं आहेत, तिथलं जगणं आहे, तिथली संस्कृती आहे. यात विनोद आहे, यात भावना आहेत, संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल असा हा रेडू आहे. निर्माता नवलकिशोर सारडा, प्रस्तुतकर्त्या विधी कासलीवाल यांच्यामुळे हा चित्रपट आपल्यापुढे येत आहे. त्यामुळे १८ मेपासून नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल.

Also Read : असा आहे 'रेडू'चा गमतीदार ट्रेलर
Web Title: Raidu film director Sagar Vanjari is telling about his journey
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.