'Quarter's trailer and poster launch' | ‘क्वॉर्टर’चा ट्रेलर व पोस्टर लाँच सोहळा संपन्न

आजवर आपण केवळ सिनेमांचे ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळयांबद्दल ऐकलं असेल, पण आता लघुपटांनाही असे सोहळे पाहण्याचं भाग्य लाभत आहे. ‘क्वॉर्टर’ या लघुपटाचा ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा ही जणू मराठी सिनेसृष्टीच्या नव्या पर्वाची सुरूवात असल्याची चाहूलच म्हणावी लागेल. नॅविअन्स् स्टुडिओ प्रा. लि. या ब्यानरखाली तयार झालेल्या ‘क्वॉर्टर’ या लघुपटाचा ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच मोठया थाटात संपन्न झाला. याप्रसंगी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते राजीव खंडेलवाल, निर्मात्या नम्रता बांदिवडेकर, दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले, संदिप काळे, आलाप भागवत, समीर सामंत, यश खन्ना,आशिष म्हात्रे, व्हिव्हियन रिचर्ड्स, अनमोल भावे, प्रशांत राणे तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. आजवर बऱ्याच लघुपटांचं, जाहिरातींचं, माहितीपटांचं दिग्दर्शन, लेखन, संकलन, छायांकन करणाऱ्या नवज्योत बांदिवडेकर या तरूण दिग्दर्शकाने ‘क्वॉर्टर’चं दिग्दर्शन केलं आहे. नम्रता बांदिवडेकर या लघुपटाच्या निर्मात्या आहेत. ‘क्वॉर्टर’च्या निमित्ताने अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोलेने प्रथमच लघुपटात अभिनय केला आहे. हे या लघुपटाचं वैशिष्टय म्हणावं लागेल. वरवर पाहता ‘क्वॉर्टर’ या शीर्षकावरून या लघुपटाचा विषय आणि आशयाचा अंदाज बांधणं कठीण असलं तरी फार थोडया वेळात यात बरंच काही सांगण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न नवज्योतने केला आहे. आजवर कधीही पडद्यावर न आलेल्या विषयावर लघुपट बनवायचा या ध्यासाने ‘क्वार्टर’चं दिग्दर्शन केलं असल्याचं सांगत नवज्योत म्हणाला की, मानवी भावभावनांचं विश्वमोठया कॅनव्हासवर रेखाटताना लेखन, दिग्दर्शन, अभिनयापासून सादरीकरणापर्यंत सारं काही प्रवाहापेक्षा वेगळ देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे. गिरीजासारख्या कसदार अभिनेत्रीने या प्रयत्नांना आपल्या अनुभवाची जोड दिल्याने ‘क्वॉर्टर’ एका वेगळयाच उंचीवर पोहोचल्याचं प्रेक्षकांनाही जाणवेल.
Web Title: 'Quarter's trailer and poster launch'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.