Pushkar Shrotri: A movie that shows the feelings of children | मुलांच्या भावविश्वात डोकावणारा चित्रपटः पुष्कर श्रोत्री

अभिनेता पुष्कर श्रोत्री उबुंटू या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळला आहे. त्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या या नव्या इनिंगबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

पुष्कर तू तुझ्या कॉमिक भूमिकांसाठी नेहमी ओळखला जातो, तरीही तू दिग्दर्शन करताना एका गंभीर विषयाची निवड का केलीस?
शाळा आणि लहान मुले हे दोन्ही माझे अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळेच उबुंटू या चित्रपटाद्वारे एक दिग्दर्शक म्हणून मी माझ्या नव्या इनिंगला सुरुवात केली. एका छोट्याशा गावातील शाळकरी मुले आपली शाळा वाचवण्यासाठी काय काय करतात याचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आणि या चित्रपटातील सगळेच कलाकार, बालकलाकारांचा अभिनय खूप आवडत असल्याचे ते आवर्जून सांगत आहेत.

या चित्रपटात अनेक बालकलाकार आहेत, लहान मुलांसोबत काम करणे सोपे आहे की कठीण असे तुला वाटते?
मी या चित्रीकरणाच्यावेळी लहान मुलांमधील एक मुलगा बनून गेलो होतो. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे तर मला खूप सोपे वाटले. या चित्रपटाचे चित्रीकरण सांगली आणि कुडाळ येथे आम्ही जवळजवळ २० दिवस करत होते. या २० दिवसांत या लहान मुलांच्या पालकांमधील कोणीच सेटवर नव्हते. या मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे एक दिग्दर्शक नव्हे तर एक पालकाप्रमाणे माझे त्यांच्यासोबत नाते बनले होते. चित्रीकरणाच्या वेळी मी त्यांच्यासोबत मजा-मस्ती देखील करायचो. तसेच त्यांना कधी वडिलांसारखा रागवायचो तर कधी त्यांना मांडीवर घेऊन समजवायचो. यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभवच खूप वेगळा होता.

या चित्रपटातील कलाकारांची निवड कशी केलीस?
या चित्रपटाची कथा लिहित असताना काही कलाकार माझ्या डोक्यात होते. संकेतची भूमिका ही मी कान्हाला (कान्हा भावे) समोर ठेवूनच लिहिली होती तर काही कलाकारांच्या निवडीसाठी मी ऑडिशन घेतले. अनेक चांगले कलाकार मला या ऑडिशन्समधून मिळाले.

सांगली, कुडाळमध्ये चित्रीकरण करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
कुडाळमध्ये चित्रीकरण करताना तर मुले खूपच खूश होती. त्यांच्यासाठी हे चित्रीकरण म्हणजे एक प्रकारची पिकनिक होती. चित्रीकरण नसले की मुले गावात फिरायची, तिथे असलेल्या नदीत कागदाच्या होड्या करून सोडायचे. सगळ्या मुलांनी चित्रीकरण करताना खूप चांगली साथ दिली. मुली तर खूपच समजुतदार असतात हे मला या चित्रपटाच्या चित्रीकरणातून कळले आहे. कोणता मुलगा मस्ती करत असेल तर त्या लगेचच त्याला समजवायच्या. सांगलीमध्ये तर आम्ही भर रस्त्यात चित्रीकरण केले आहे. लोकांनी मला ओळखू नये म्हणून मी मास्क घालून देखील फिरत असे. पण एकंदरीत चित्रीकरणाचा अनुभव खूपच छान होता. चित्रीकरणाच्या वेळेची एक गंमत मी आवर्जून सांगेन, सगळी मुले आणि मी हॉटेलमध्ये राहात होतो. चित्रीकरणाच्या तीन-चार दिवसांनी माझ्या हातात एक भले मोठे हॉटेलचे बिल आले, ते पाहून ही मुले सेटवर व्यवस्थित जेवूनदेखील हॉटेलवर काय काय मागवतात हे मला कळले. त्यानंतर मी त्यांना समजवून असे करू नका असे सांगितले आणि त्यांनीदेखील ते लगेचच ऐकले. पण त्यांना मी आवर्जून त्यांचे आवडते चिकन लॉलीपॉप रोज रात्री खायला देत असे. 

Also Read : उबुंटू चित्रपटाच्या टीमने लोकमत ऑफिसला दिली भेट


 
Web Title: Pushkar Shrotri: A movie that shows the feelings of children
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.