Problem Free Moment in "I'm not a Problem" | ​​“मला काहीच प्रॉब्लेम नाही”मधील प्रॉब्लेम फ्री क्षण

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा, रवी सिंग यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित प्रॉब्लेम फ्री असा “मला काहीच प्रॉब्लेम नाही” चित्रपट येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नात्यांची बदलती परिभाषा उलगडणाऱ्या 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाच्या कलाकारांकडून चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोडल्या गेलेल्या नात्यांचे हे प्रॉब्लेम फ्री क्षण...

समीर विद्वांस:
'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटात नागपुरी स्त्रीची भूमिका साकारणारी निर्मिती ताई सतत सेटवर कानाला हेडफोन्स लावून वावरताना दिसत होती. तिचे हे वागणं आमच्या कोणाच्याच लक्षात येत नव्हतं आणि म्हणून एकदा मी तिला विचारलं, “तू का अशी सतत कानात हेडफोन्स घालून असतेस?" तेव्हा तिने मला सांगितलं की, "अरे मी गाणी वगैरे ऐकत नाहीये काही! मी भारतीकडून आपले सगळे डायलॉग रेकॉर्ड करून घेतलेत ते ऐकतेय. तुला चालेल ना मी असं केलेलं?" आपल्या इंडस्ट्रीतल्या इतक्या सिनियर कलाकाराची परफेक्शनसाठीची जिद्द पाहून मी थक्क झालो. निर्मिती ताई आणि तिच्याबरोबरच माझ्या इतर सर्व गुणी कलाकारांबरोबर परत परत काम करायला "मला काहीच प्रॉब्लेम नाही"!


 
स्पृहा जोशी
मी आणि समीर विद्वांस आम्ही खूप जुने मित्र आहोत. बऱ्याच वर्षांपासून आम्हाला एकत्र काम करायची इच्छा होती पण आमचे योग जुळत नव्हते. 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाच्या निमित्ताने ती संधी आम्हाला मिळाली. जेव्हा सर्वांत पहिल्यांदा समीरने मला स्क्रिप्ट ऐकवली तेव्हाच मला ती खूप आवडलेली. पण त्यानंतर मला कॅरेक्टरबद्दल सांगताना तो खूप संकोच करत होता. कारण या चित्रपटातील केतकीला चार वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला असं वाटलेलं की, मी हा रोल नाकारेन. पण खरं तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि त्याच क्षणापासून समीरला होकार देऊन मी संपूर्णपणे प्रॉब्लेम फ्री झाले.
 
विजय निकम
मी आणि कमलेश सावंत दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले आहोत. आम्ही दोघं “मला काहीच प्रॉब्लेम नाही” या चित्रपटाच्या शूटींगच्या दरम्यान एकच रूम शेअर करत होतो. तेव्हा एकत्र राहत असताना कमलेशने माझा स्वभाव, माझ्या हरकती टिपून त्याचे गमतीदार मजेशीर असे किस्से बनवून जवळ-जवळ संपूर्ण युनिटभर मला फेमस केलं. त्यामुळे शूटिंग झालं की, रात्री माझे गमतीदार किस्से ऐकण्यासाठी समीर, गष्मीर, स्पृहा, निर्मिती ताई, सतीश आळेकर असे सर्वजण एकत्र जमायचे आणि माझ्या किस्स्यांची मैफिल रंगायची आणि हास्याचं वारं वाहायचं. माझ्या किस्स्यांच्या या मैफिलीची मजा जितकी बाकी सगळे घ्यायचे तितकीच मी स्वतः सुद्धा घ्यायचो. त्यामुळे कमलेशचा आणि माझ्या मैत्रीचा हा सिलसिला असाच सुरू असणार आहे आणि त्याचा 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'.
 
कमलेश सावंत
गुहाघरमध्ये आम्ही शूट करत असताना माझे छोटा तनय म्हणजेच आरश गोडबोलेसोबत एकत्र चित्रीकरण सुरू होते. तेव्हा आरशला ५-६ वेळा रिटेक द्यावे लागत होते. म्हणून समीर त्याला समजावत होता की, "अरे!  तुझे इतके रिटेक होत असल्यामुळे सगळ्यांनाच पहिल्यापासून करावं लागतंय. त्यानंतर त्याने तो शॉट छानपैकी दिला. नंतर जेव्हा मुंबईत शूट सुरू होतं, तेव्हा एका शॉटला मला २-३ रिटेक द्यावे लागले, तेव्हा तनय माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "अरे नीट कर ना! तुझ्यामुळे मला पण पहिल्यापासून करावं लागतंय ना" हा हा हा... त्याचं हे वाक्य ऐकल्यावर मी त्याला म्हणालो "हो रे बाबा, सॉरी हा! मला माफ कर. मी रिटेक रोशन आहे ना. त्यामुळे असं होतंय". हा हा हा... लहान मुलं कधी काय बोलतील काही नेम नाही. पण त्यांच्याबरोबर काम करण्यात एक वेगळीच मजा असते, म्हणून त्यांच्याबरोबर काम करायला 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'.
 
मंगल केंकरे
या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि निर्मिती सावंत आम्ही दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करत होतो. या आधी मी तिच्याबद्दल खूप ऐकून होते की, ती खूप स्ट्रिक्ट आहे वगैरे... पण तिच्याबरोबर काम केल्यावर कळलं की, तसं खरंच काही नाहीये ती खूपच गोड आहे. आधी हाय-बाय पुरता मर्यादित असलेले आमचं नातं आता मैत्रीत बदलले आहे. या माझ्या मैत्रिणीसोबत पुन्हा–पुन्हा काम करायला ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’. 
 
स्नेहलता वसईकर
आजवर मी नेहमीच व्हिलनच्या भूमिका साकारल्या. पण ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटातील माझी भूमिका पूर्णपणे वेगळी होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ज्यावेळी संपूर्ण गेटअपमध्ये रेडी होऊन मी माझा पहिला शॉट दिला तेव्हा सतीश आळेकर सरांनी माझं खूप कौतुक केलं. आमचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांना जाऊन पात्रांची निवड उत्तम आहे आणि त्यात स्नेहलता या पात्राला अगदी साजेशी असल्याची पोचपावती दिली, अशा अनुभवी आणि आपल्या चांगल्या कामासाठी पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या कलाकारांबरोबर काम करायला "मला काहीच प्रॉब्लेम नाही"!
 
डॉ. साहिल कोपर्डे
घरापासून 17 दिवस लांब, तेही शूट साठी, असे पहिल्यांदा घडले होते माझ्यासोबत. इतके मोठे प्रोडक्शन, समीर सारखा कसलेला दिग्दर्शक आणि एकसे एक दिग्गज कलाकार. सुरुवातीला खूप नर्व्हसनेस होता. तसा माझा स्वभाव अलिप्त राहणारा, वेळ घेऊन लोकांमध्ये मिसळणारा, कोणी थट्टा केली की पटकन रागावणारा... त्यात हॉटेलमध्ये माझ्या रूमच्या काही अंतरावरच विजय दादा आणि कमलेशची रुम... म्हणजे रूममध्ये असो वा सेटवर थट्टा चेष्टा-मस्करी खेचा-खेची हे अनिवार्य... त्यात नंतर-नंतर आमचे दिग्दर्शक समीर सर पण सामील झाले... आधी मला थोडा राग यायचा पण नंतर मात्र मी पण ते खूप एन्जॉय करू लागलो. माझा एखादा शॉट चुकला किंवा छान झाला की, हे तिघेही मी कुठे चुकतोय किंवा हा सीन छान झाला आहे हे आवर्जून सांगायचे. त्यामुळे माझी यांनी कितीही चेष्टा-मस्करी केली तरी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही!'.

गष्मीर महाजनी
आपल्या कलाकाराला केव्हा मार्ग दाखवावा आणि केव्हा मोकळं सोडावं याची उत्तम जाणीव असणारा दिग्दर्शक आणि कळत नकळत आपल्याला आपल्याच कामाविषयी विचार करायला लावणारी अशी एक गुणी अभिनेत्री अशा दोघांचा सहवास आणि मैत्री या चित्रपटाच्या निमित्ताने मला लाभली... आता 'मला काहीच प्रॉब्लेम नाही!'

सतीश आळेकर
फिल्मी किडा प्रोडक्शन्स आणि कॅप्टन ऑफ द शिप आमचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्यामुळे राहण्याच्या सोयीपासून ते खाण्याच्यासोयीपर्यंत आणि शूटिंगच्या वेळा इतक्या व्यवस्थित मॅनेज होत्या की, खरंच आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला आणि निर्मिती सावंत कोकणात इतकी फेमस आहे की, कोकणातली सर्वसामान्य लोकं रोज तिच्यासाठी काही ना काही बनवून सेटवर डबे आणायचे आणि ती आम्हा सर्वांसमवेत वाटून खायची. त्याचा पोटभरून आनंद घ्यायचो. त्यामुळे सेटवर खाण्याची चंगळ असल्याकारणास्तव वारंवार कोकणातील प्रेमळ माणसांच्या सहवासात शूट करण्यासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही.
Web Title: Problem Free Moment in "I'm not a Problem"
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.