Prem Kiari Houseful of 'Shakti' organized by Lokmat Child Development Forum | लोकमत बाल विकास मंचातर्फे आयोजित 'फिरकी'चा प्रीमिअर हाऊसफुल्ल

नव्या दमाच्या बालकलाकारांच्या अभिनयाने नटलेला  ‘फिरकी’ सिनेमा कलाकारांच्या उपस्थितीत पाहण्यासाठी पुण्यातील बालचमू तर उत्साहाने सळसळत होताच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सखी मंचच्या समन्वयिका, सदस्य तसेच लोकमतचा वाचकवर्ग बाल कलाकारांना लाजवेल अशा उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित होता. टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी सिनेमाहॉल मध्ये चित्रपटाच्या कलाकारांचं स्वागत केलं. चित्रपटाचा प्रीमिअर सुरू होण्याआधी प्रेक्षकांशी बोलण्यासाठी कलाकार पुढे सरसावले. पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर, अथर्व उपासनी यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेली मजामस्ती सांगताना म्हटले, ‘‘शूटिंगच्या वेळी आम्ही तर राडाच केला. सिनेमा पाहताना तुम्हीही तो अनुभवालंच. आम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांविषयी जास्त उत्कंठा आहे.’’ 

पार्थ भालेराव याने आधी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर 'भूतनाथ रिटर्न्स', कान्स फेस्टिवल मध्ये प्रदर्शित झालेला 'खालती डोकं वरती पाय', 'तुकाराम', 'आजचा दिवस माझा' अशा सिनेमांमधून दर्जेदार अभिनय केला आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एलिझाबेथ एकादशी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवणारा 'गण्या' म्हणजे पुष्कर लोणकर. त्याने 'बाजी', 'चि. व चि. सौ. कां.', 'टीटीएमएम' अशा अनेक चित्रपटातून काम केले आहे व त्यांच्या जोडीला किल्ला व अमरिका सिनेमांमध्ये दिसलेला बालकलाकार अथर्व उपासनी. याशिवाय ह्रषिकेश जोशी, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, किशोर चौघुले हे मराठीतील नावाजलेले कलाकरही आपला ठसा तितक्याच प्रगल्भपणे उमटवून जातात . 

लोकमत बाल विकास मंचच्या अंतर्गत आयोजिण्यात आलेल्या या प्रीमिअरला मुख्य कलाकारांसोबत सहकलाकार अभिषेक भराटे, अथर्व शाळिग्राम, दिग्दर्शक सुनिकेत गांधी व निर्माते मौलिक देसाई उपस्थित होते. चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना रसिकांच्या चेहऱ्यावर बालपण पुन्हा नव्याने अनुभवल्याचे समाधान तरळत होते.

Web Title: Prem Kiari Houseful of 'Shakti' organized by Lokmat Child Development Forum
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.