Preferred viewers get a movie trailer | ​बेधडक चित्रपटाच्या ट्रेलरला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

पिळदार शरीर आणि प्रभावी अभिनय ही अशोक समर्थ यांची खासियत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा अशा बॉक्सिंग ट्रेनरच्या भूमिकेत ते 'बेधडक' या चित्रपटात दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या १ जूनपासून "बेधडक" हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचे लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून गिरीश टावरे याचे अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत आहे.
बेधडक हा बॉक्सिंगवरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. उत्तम फिजिक असलेल्या नव्या अभिनेत्याचे या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या  काळात एक दमदार आणि पुरेपूर मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल', असे निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी सांगितले.
गिरीश टावरेचे अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मंगेश कांगणे, गोविंद टावरे आणि प्रवीण बांदकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रवीण बांदकर यांचे संगीत लाभले असून आदर्श शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
बेधडकचे पहिले टायटल पोस्टर जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. तेव्हापासूनच या चित्रपटाने उत्सुकता निर्माण केली होती. त्यानंतर या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियात लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेला बलदंड हात दिसत होता. तसेच सामान्य स्वप्नांचा, असामान्य पाठलाग अशी या चित्रपटाची टॅगलाईन देखील दिसत होती. त्यावरून हा चित्रपट बॉक्सिंगवरचा आणि अॅक्शनपॅक्ड असणार हे स्पष्ट झाले होते. 

Also Read : संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'
Web Title: Preferred viewers get a movie trailer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.