The opportunity for singing a Yantam movie is available for the participants of this film | ​सारेगमपमधील या स्पर्धकाला मिळाली यंटम चित्रपटात गाण्याची संधी

नावापासूनच आपलं वेगळेपण जपलेल्या 'यंटम' या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, समीर आशा पाटील दिग्दर्शित 'यंटम' या चित्रपटासाठी चिनार-महेश या संगीतकार जोडीने या चित्रपटाच्या संगीतामध्ये काही खास प्रयोग केले आहेत. आपल्या अनोख्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या यंदाच्या सारेगमप फायनलिस्ट योगेश रणमाळे या नव्या दमाच्या गायकाने या चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे.
'यंटम' चित्रपटाचा म्युझिक लाँच नुकताच कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आजवर आपल्या प्रत्येक चित्रपटातून महाराष्ट्राची दाद मिळवलेला निर्माता दिग्दर्शक रवी जाधव चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता आहे. गीतकार मंगेश कांगणेने गीतलेखन केले असून या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. त्यात 'ठाव लागना. ..' हे गाणे हर्षवर्धन वावरेने, 'गरा गरा. 'हे ड्युएट गाणे हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी, 'आनंद झाला फार....' हे गाणे छगन चौगुले यांनी आणि 'यंटम झाला....' हे टायटल साँग योगेश रणमाळेने गायले आहे. समीरसह मेहुल अघजा यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. 
यंदाच्या सारेगमपच्या पर्वावेळी परीक्षक म्हणून काम करताना रवी जाधवने योगेशचा आवाज ऐकला होता. त्यामुळे 'यंटम'च्या टायटल साँगसाठी गायकाच्या शोधात असलेल्या संगीतकार चिनार-महेश यांना रवी जाधवने योगेशचे नाव सुचवले. चिनार-महेश यांनी योगेशच्या आवाजावर खूश होऊन गाण्यासाठी निवड केली. ग्रामीण भागातून आलेल्या योगेशने या गाण्याआधी रेकॉर्डिंग स्टुडिओही पाहिला नव्हता. त्यामुळे चिनार-महेश यांनी योगेशला गाण्याच्या तंत्रापासून सारे काही शिकवत त्याच्याकडून गाणे गाऊन घेतले. योगेशनेही हे धडे मनापासून गिरवत उत्तम पद्धतीने हे गाणे निभावले असे दिग्दर्शक समीर आशा पाटीलने 
सांगितले.
चित्रपटाचे संगीत देताना त्याच्या कथेचा, त्यातल्या वातावरणाचा, भाषेचा विचार करावा लागतो. 'यंटम'चे कथानक नक्कीच वेगळे आणि मनोरंजक आहे. या चित्रपटाच्या संगीतात प्रयोग करण्याची आम्हाला संधी होती. चित्रपटाचे कथानक ग्रामीण पार्श्वभूमीवरचे असले, तरी त्यातली भावना युनिर्व्हसल आहे. त्यामुळे गाणी ग्रामीण भाषेत आणि संगीत आजच्या मॉडर्न पद्धतीचे असा प्रयोग आम्ही केला आहे. प्रेमगीत, गोंधळ अशी वैविध्यपूर्ण गाणी या चित्रपटात आहेत. आजच्या तरुणांना आवडेल, असा गाण्यांचा साऊंड आहे. तसेच सनईचे दोन वेगळे ट्रॅक्सही या चित्रपटात ऐकायला मिळतील. चित्रपटाचे सगळं संगीत लाईव्ह पद्धतीने रेकॉर्ड केले आहे. त्यामुळे ओरिजिनल साऊंड हे या चित्रपटातील गाण्याचे वैशिष्ट्य आहे, विंड्स ऑफ चेंज आणि साँग ऑफ लाईफ या म्युझिकल ट्रॅक्ससाठी ओंकार धुमाळने सनई वादन केले असल्याचे संगीतकार चिनार-महेश यांनी सांगितले. 
अभिनेते सयाजी शिंदे, वैभव कदम, अपूर्वा शेळगावकर, ऐश्वर्या पाटील, अक्षय थोरात आणि ऋषिकेश झगडे यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. म्युझिकल जर्नीची अनोखी ट्रीट देणारा यंटम २ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

Also Read : फेसबुकवरून सापडला यंटमचा हिरो!
Web Title: The opportunity for singing a Yantam movie is available for the participants of this film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.