Only due diligence could be achieved: Smita copper | मेहनतीमुळेच यश मिळवू शकलेः स्मिता तांबे

स्मिता तांबेने ७२ मैल, परतू यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नूर या हिंदी चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. आता ती रुख या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाबाबत आणि तिच्या एकंदर कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...

रुख या चित्रपटाचा तुझा प्रवास कसा सुरू झाला?
मी अमेरिकेत माझ्या एका कामासाठी गेले असता तिथे मला या चित्रपटाची स्क्रिप्ट पाठवण्यात आली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ती स्क्रिप्ट येवढी चांगली होती की रात्री अकरा ते अडीज या वेळात मी ती पूर्ण वाचून काढली आणि या चित्रपटात मला काम करायचेच असे मी ठरवले. आई-वडील आणि त्यांच्या मुलाचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मी मुलाच्या आईच्या भूमिकेत आहे तर मनोज वाजपेयी माझ्या पतीची भूमिका साकारत आहेत.

मनोज वाजपेयीसारख्या मातब्बर कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
मनोज वाजपेयी हे अभिनेते म्हणून चांगले आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण ते एक सहकलाकार म्हणून देखील खूप चांगले असल्याचे या चित्रपटाच्या निमित्ताने मला जाणवले. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधी आम्ही काही तालमी केल्या होत्या. त्यावेळी देखील ते आवर्जून उपस्थित असायचे. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे असे मला वाटते. त्यांचे संवाद ऐकताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. 

मराठी चित्रपटांकडून तू हिंदीकडे कशी वळलीस?
हिंदी चित्रपटांचा कॅन्व्हॉस हा खूप मोठा आहे. त्यामुळे मी हिंदीत काम करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. मी मराठीत आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्याने माझ्यासाठी चांगली भूमिका असेल तर दिग्दर्शक-निर्माते माझा विचार करणार याची मला खात्री आहे. त्यामुळे मी माझा वेळ मराठीत नव्हे तर हिंदीत भूमिका शोधण्यासाठी दिला. मी गेल्या काही वर्षांपासून अनेक लोकांना भेटत असे. तसेच दरम्यानच्या काळात मी अनेक ऑडिशन दिले आहेत. अनेकवेळा तर मला शार्ट लिस्ट करण्यात आले. पण चित्रपटात काम करण्याची मला संधी मिळाली नाही. तरीही मी हार पत्करली नाही आणि त्याचमुळे आज मला खूप चांगले चित्रपट मिळत आहेत.

मराठीत आणि हिंदीत काम करताना काही फरक जाणवतो का?
दोन्ही चित्रपटसृष्टीत काही फरक असल्याचे मला जाणवत नाही. फक्त मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटामुळे आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यावर जितके मला फोन येतात, त्याच्या कित्येक पट फोन रुख या चित्रपटानंतर मला येत आहेत.
Web Title: Only due diligence could be achieved: Smita copper
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.