'Obsession' telling a story of friendship | ​मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’

काही दिग्दर्शकांनी हिंदीसोबतच प्रादेशिक सिनेसृष्टीतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक नागेश दरक हे त्यांपैकीच एक. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही लक्षवेधी कामगिरी करत दक्षिणेकडचा मानाचा ‘नंदी’ पुरस्कार पटकविणारे दिग्दर्शक नागेश दरक मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’ हा चित्रपट घेऊन आले आहेत. १९ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
सोनाली एन्टरटेन्मेंट फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘ओढ’ची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या नागेश दरक यांच्याबाबत सांगायचं तर कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या बऱ्याच सिनेमांसाठी दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना असिस्ट केलं होतं. याशिवाय ‘मराठा बटालियन’, ‘नवरा मुंबईचा’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मराठी चित्रपटांचंही यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटाच्या तामिळ रिमेकसाठी त्यांना ‘नंदी’ पुरस्कार देण्यात आला. लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि निर्मितीमूल्यांपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देणारा ठरेल अशी आशाही दरक यांनी व्यक्त केली आहे. नागेश दरक यांच्यासह एस. आर. तोवर यांनी या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे. 

गणेश तोवर व उल्का गुप्ता या नव्या जोडीसोबत मोहन जोशी,  भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांच्या ‘ओढ’ चित्रपटात भूमिका आहेत. कथा आणि पटकथा दिनेशसिंग ठाकूर यांनी लिहिली आहे. यासोबतच गणेश कदम आणि दर्शन सारंग यांच्या साथीने ठाकूर यांनी संवादलेखनही केलं आहे. रविकांत रेड्डी यांनी छायांकन तर संकलन समीर शेख यांनी केले आहे. ‘ओढ’ चित्रपट १९ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Web Title: 'Obsession' telling a story of friendship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.