Music launch of 'Thank You Vitthal', starring Mahesh Manjrekar and Makrand Anaspure | ​महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे म्युझिक लाँच
​महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे म्युझिक लाँच
मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. असाच वेगळ्या आशय आणि विषयाच्या ‘Thank U विठ्ठला’ या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा अभिनेता–दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे आणि अंजली सिंग यांनी केली असून कथा, दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे. येत्या ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला संदेश देणारा ‘Thank U विठ्ठला’ हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे अभिनेता महेश मांजरेकर यांनी याप्रसंगी सांगितले. मी आणि मकरंद अनासपुरेनी ‘Thank U विठ्ठला’च्या निमित्ताने बऱ्याच दिवसाने एकत्र काम केले असून आम्ही जितका हा चित्रपट एन्जॉय केला तितकाच तो प्रेक्षकही एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी याप्रसंगी व्यक्त केला.
प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखे आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेले सहज सुंदर जगणेही हल्ली प्रत्येकजण विसरून गेले आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास पाहायला मिळणार असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात पाहाता येईल.
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद साफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा आणि बालकलाकार वरद यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
विजय शिंदे, दीपक कांबळी, मच्छिंद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Also Read : महेश मांजरेकर झळकणार साहोमध्ये

Web Title: Music launch of 'Thank You Vitthal', starring Mahesh Manjrekar and Makrand Anaspure
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.