The movie 'Magnets' will soon see the audience coming soon | ‘चुंबक’ चित्रपट लवकरच येणाऱ्या प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारने सामाजिक माध्यमांचा आधार घेत शुद्ध मराठीत एक घोषणा केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत हलचल माजली आहे. अक्षयने एक व्हिडीओ प्रकाशित करून ‘चुंबक’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाची प्रस्तुती तो स्वतः करत असल्याची घोषणा केली होती. ‘चुंबक’च्या चमूने आता या चित्रपटातील तीन आघाडीच्या व्यक्तीरेखांपैकी एक असलेल्या ‘बाळू’ या पात्राचे एक पोस्टर प्रकाशित केले आहे. बाळूच्या या भूमिकेत पुण्याचा साहिल जाधव हा किशोरवयीन कलाकार पदार्पण करत आहे.  

या चित्रपटात बाळू एका रेस्टॉरंटमधील वेटरच्या भूमिकेत आहे. तो आपले एक छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. ते स्वप्न त्याच्यावरील या पोस्टरवरून अधोरेखित होते. साहिल जाधव हा पुणे येथे राहणारा आणि शाळेत शिकणारा किशोरवयीन मुलगा आहे.‘चुंबक’च्या माध्यमातून तो आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्याला समोर गेला आहे. साहिलचा या भूमिकेसाठी शोध कसा लागला याची या चमूने सांगितलेली कथा मोठी रंजक आहे. 
 

रोमिल मोदी आणि तेजस ठक्कर या जोडीच्या कास्टिंग चमूवर बाळूच्या व्यक्तिरेखेसाठी एक कलाकार शोधण्याचे कर्मकठीण काम येऊन पडले होते. हा कलाकार एक चांगला अभिनेता तर हवाच होता पण त्याच्यातील निरागसता कायम असेल आणि त्याचवेळी तो प्रगल्भ असेल अशा व्यक्तीचा शोध या जोडीला करायचा होता. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप मोदी यांनी नक्की केलेली ही त्याची चौकट होती.  

अनेक आठवडे कास्टिंगचे हे काम करूनही आणि तब्बल २५०हूनही अधिक मुलांचे विविध जिल्ह्यांमध्ये जावून ऑडीशन घेवूनही या चमूच्या हाती काही लागत नव्हते. त्यांनी मग ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु करण्याचे ठरवले. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शुभारंभाला २५ दिवस होते. अशावेळी साहिल जाधव हा शाळकरी मुलगा या जोडीला भेटला. तो हौशी रंगभूमीवर कार्यरत होता. 

यापूर्वी साहिल कधीही कॅमेऱ्याला सामोरा गेला नव्हता. त्याला त्याच्या या भूमिकेत लवकरात लवकर शिरणे गरजेचे होते. त्याने या भूमिकेच्या तयारीसाठी दोन आठवड्यांमध्ये एक कार्यशाळा पूर्ण केली आणि दिग्दर्शक संदीप मोदी आणि लेखक सौरभ भावे यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. आपल्याकडून व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय मिळावा म्हणून त्याने रेस्टॉरंटमध्ये काम केले आणि तेथील वेटर्सबरोबर तो काही दिवस राहीलाही. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
Web Title: The movie 'Magnets' will soon see the audience coming soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.