Message Gaur and Sheetal Tiwari will play the lead role of Zing Prema on this day | संदेश गौर आणि शीतल तिवारी यांची मुख्य भूमिका असलेला झिंग प्रेमाची या दिवशी होणार प्रदर्शित

प्रेम एक अशी भावना आहे की, वर्षानुवर्षे त्यावर जगभरातील चित्रकर्मी चित्रपट बनवत आलेत आणि पुढेही बनवतील. प्रेमात असलेल्या व्यक्ती अंगावर मोरपीस फिरवल्याप्रमाणे वावरत असतात. त्यांना संपूर्ण जग सुंदर दिसत असतं आणि प्रत्येक व्यक्ती चांगली. थोडक्यात त्यांना प्रेमाची झिंग असल्यासारखे भासत असतं. अशाच मानसिकतेवर आधारित चित्रपट आहे 'झिंग प्रेमाची'.
शाहिद खान यांनी व्ह्यूफाईंडर प्रॉडक्शनच्या अंतर्गत आणि विजय उषा बॅनरखाली निर्माते विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन केलंय. बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून त्यांचं 'झिंग प्रेमाची' चित्रपटातून मराठी दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे. या चित्रपटात संगीताचे बरेच महत्व असून महेश-राकेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि गीतं विजय गमरे आणि शाहिद खान यांच्या लेखणीतून उतरली आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून त्यातील एक सुफी साँग येणाऱ्या रमजान ईदमुळे अजूनच खास झालंय.
या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाणी ताज महाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक ठिकाणी चित्रित करण्यात आली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालला निखळ प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि याच ठिकाणी या चित्रपटातील प्रेमींवर गाणं चित्रित झाल्यामुळे 'झिंग प्रेमाची' सिनेमामध्ये रोमान्सची उच्च अनुभूती अनुभवायला मिळणार आहे. 
एका गावात राहणारे दीपक आणि ज्योती यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम असतं. परंतु गाव, समाज आणि त्यांच्या घरच्यांचा प्रखर विरोध असतो. रविकांत हा गावगुंड त्यांच्याबाबतीत अनेक अफवा उडवतो. त्यामुळे दोघांच्या घरातल्यांचा रोष अजूनच वाढतो. ज्योतीचा भाऊ विशाल समंजस असतो आणि ज्योती आणि दिपकचे एकमेकांवरील प्रेम पाहून त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतो. त्याच्या मदतीने ते गावातून पसार होतात का? शहरात जाऊन आपला संसार थाटतात? पुढे काय? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे “झिंग प्रेमाची” या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे.  
या चित्रपटातून संदेश गौर आणि शीतल तिवारी हे नवीन चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहेत. त्यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीत बरंच नाव कमावलेलं असून त्यांना मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवायचंय. त्यांच्यासोबत अमोल चौधरी, रतन सोमवरे आणि अनिल मोरे हेदेखील मराठीत पदार्पण करत असून त्यांना रंजीत जोग, स्मिता पवार, मोहक कंसारा, मृणालिनी  जांभळे, जयराम शाहू, विपुल देशपांडे, पोपटराव चव्हाण, दिपज्योती नाईक, स्मृती पाटकर आणि गणेश यादव यांची मोलाची साथ लाभलीय. २९ जून २०१८ ला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Also Read : भला माणूस या चित्रपटातील रोमँटिक साँग झाले नागपूरमध्ये चित्रीत

Web Title: Message Gaur and Sheetal Tiwari will play the lead role of Zing Prema on this day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.