Meet the crowd of cinema soon | मोर्चा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

३ इडिएटचा हा हिंदी सिनेमा तुम्हाला आठवतोय का ? त्यातला मिलीमीटर जो नंतर पुढे जाऊन सेंटीमीटर होतो. तो सेंटीमीटर म्हणजे आपला मराठी कलाकार दुष्यंत वाघ. कलाकारच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की त्यामुळे त्याच्या करिअरला पूर्णपणे कलाटणी मिळते. होय. असंच काही दुष्यंतच्या बाबतीत घडलं आहे. दुष्यंतला अचानक ३ इडिएट या सिनेमात सेंटीमीटरची भूमिका मिळाली आणि त्याचे जीवनच बदलून गेले. राजू हिरानी सारख्या मोठ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव आणि करीना कपूर, शरमन जोशी, आर माधवन सारख्या बड्या कलाकारांचा सहवास त्याला लाभला. हाच दुष्यंत आता अखिल देसाई दिग्दर्शित मोर्चा या मराठी सिनेमात एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबईत लहानाचा मोठा झालेल्या दुष्यंतने ३ इडिएट पूर्वी अनेक मराठी मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. खरंतर मुन्नाभाई एमबीबीएससाठी त्याची ऑडिशन झाली होती. जिमी शेरगिलच्या भूमिकेसाठी पण वय कमी असल्याने ती भूमिका त्याला मिळाली नाही नंतर राजकुमार हिरानी यांनी त्याला ३ इडिएटसाठी बोलावले. मोर्चा सिनेमाबद्दल दुष्यंत सांगतो की, खरंतर मोर्चा सिनेमाची गोष्ट एकली तेव्हाच मी होकार दिला होता. कारण मोर्चा हा सिनेमा आजच्या आपल्या समाजव्यवस्थेवर कडाडून भाष्य करणारा सिनेमा आहे. सिनेमात अनेक ज्वलंत आणि सामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न घेण्यात आले आहेत तेही मनोरंजक पद्धतीने आहेत हीच या सिनेमाची जमेची बाजू आहे. मोर्चा सिनेमात मी राम देशमाने हा एक राजकीय पुढारी साकारतो आहे, जो आजच्या राजकीय पुढारीचे प्रतिनिधित्व करतो.

मोर्चा सिनेमातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, आपण जागरूक नागरिक आहोत, आपल्या मताधिकाराची खरी ताकत आपण ओळखली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे विचार केला आणि तशी वागणूक ठेवली तर कोणत्याही राजकीय पुढारीला आपण त्यांची जागा दाखवून देऊ शकतो. म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे, जो २३ मार्च पासून प्रदर्शित होत आहे. माझ्यासोबत सिनेमात संजय खापरे, कमलेश सावंत, दिगंबर नाईक, अनिकेत केळकर. उदय सबनीस, किशोर चौगुले, गौरी कदम, अंशुमन विचारे, आरती सोळंकी, संदीप गायकवाड, संदीप जुवटकर, संजय पाटील आणि प्रिया यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.
Web Title: Meet the crowd of cinema soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.