Marathi song 'Sambhalgun Dhubhalgang' is the first Marathi song on the Swiss Radio! | 'संभळगं ढंभळंग' स्विस रेडियोवर वाजणारं पहिलं मराठी गाणं!

टियाना प्रोडक्शनचं 15 एप्रिल 2018 ला रिलीज झालेलं आदर्श शिंदेने गायलेलं ‘संभळंग ढंभळंग’ हे गाणं उभ्या महाराष्ट्रात गेले एक महिना गाजल्यावर आता हे गाणं जगविख्यात स्विस रेडियो स्टेशन ‘रिपब्लिक कलकुटा’लाही खूप आवडलं आहे. रिपब्लिक कलकुटाकडून हे गाणं त्यांच्या नॅशनल टेलिव्हीजन चॅनल आणि रेडियो स्टेशनच्या प्लेलिस्टमध्ये चालण्यासाठी मागवण्यात आलं आहे. असं आमंत्रणं मिळालेलं ‘संभळंग ढंभळंग’ हे पहिलं मराठी गाणं आहे.

ह्यासंदर्भात संपर्क केल्यावर टियाना प्रॉडक्शनचे संस्थापक संचालक सुजीत जाधव म्हणाले, “हे आमच्या प्रॉडक्शनचे पहिलेच गाणे आहे. आदर्श शिंदेने गायलेल्या ह्या गाण्याला प्रेक्षकांची दाद मिळेल असा आम्हांला विश्वास होता. पण महाराष्ट्रात ते एवढे गाजेल असे वाटले नव्हते. ह्या आनंदातच आता जगविख्यात स्विस रेडियो स्टेशनकडून आपणहूनच आमच्या गाण्याला त्यांच्या प्लेलिस्टमध्ये चालवण्यासाठी मिळालेलं आमंत्रणं म्हणजे आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.”

ते पूढे सांगतात, “रिपब्लिक कलकुटा हे स्वित्झर्लंडमधले प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेडियो स्टेशन आहे. त्यांच्याकडून आम्हांला आमंत्रण येणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. देश-विदेशांतली निवडकच गाणी ह्या रेडियो स्टेशनवर चालतात. आणि त्यांची संगीत जाणकारांची टिम गाण्यांची निवड करते. अशावेळी संभळंग ढंभळंगला हा मान मिळणं, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.”  

अनेक मराठी सिनेमांमधून आपण आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे. 'दुनियादारी' या सिनेमातील "देवा तुझ्या गाभाऱ्याला" गाणे असो किंवा 'दगडी चाळ' मधील "मोरया" हे गाणे त्याच्या आवाजाने गाण्याला एक वेगळा साज येतो. ’देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही… या दुनियादारी सिनेमातील गाण्यामुळे आदर्श शिंदेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या गाण्याने त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याला अनेक गाण्यांची ऑफर मिळाल्या. आज मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक गायक असे त्याला मानले जाते. 

Web Title: Marathi song 'Sambhalgun Dhubhalgang' is the first Marathi song on the Swiss Radio!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.