In the Marathi film Gulshan Devayya Daav | ​गुलशन देवैया डाव या मराठी चित्रपटात

सैराट या मराठी चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीसोबतच हिंदी इंस्ट्रीमधील अनेकांनादेखील वेड लावले आहे. मराठीत सध्या खूप चांगले चित्रपट बनवले जात आहेत. तसेच मराठीतील चित्रपटांची कथा ही हिंदी चित्रपटांच्या तुलनेत अतिशय सरस असल्याचे अनेक बॉलिवूडमधील मंडळीचे म्हणणे आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक मंडळी सध्या मराठी चित्रपटांकडे वळले आहेत. तसेच अनेकांना मराठीत काम कऱण्याची इच्छा आहे. 
गुलशन देवैयाने दम मारो दम, शैतान, हेट स्टोरी, गलियों की रासलीला राम लीला, हंटर, अ डेथ इन द गुंज यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हंटर या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तर चांगलीच चर्चा झाली होती. गुलशनने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात दॅट गर्ल इन यल्लो बुट्स या लघुपटाद्वारे केली. हा लघुपट अनेक फेस्टिव्हलमध्ये गाजल्यामुळे त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली. या लघुपटामुळेच त्याला बॉलिवूडच्या अनेक ऑफर्स मिळाल्या. लघुपटानंतर त्याने दम मारो दम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री मारली. 
शैतान या चित्रपटात तो कल्की कोच्लिनसोबत झळकला होता. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकनदेखील मिळाले होते. बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर तो आता मराठी चित्रपटांकडे वळला आहे. डाव या मराठी चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये बनवला जाणार असून या हिंदी चित्रपटाचे नाव हादसा आहे. या चित्रपटात तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत असून हा एक क्राइम थ्रिलर असणार आहे. तसेच डाव हा चित्रपटदेखील मराठी असला तरी या चित्रपटात संवाद म्हणताना मराठीसोबत इतर भाषांचादेखील वापर केला जाणार आहे. गुलशनने हंटर या चित्रपटात एक मराठी व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने मराठीत काही संवाददेखील म्हटले होते. पण खऱ्या आयुष्यात त्याचे मराठी इतके चांगले नसल्याचे तो सांगतो. डाव या चित्रपटासाठी त्याने खास मराठीचे धडे गिरवले आहेत. याविषयी गुलशन सांगतो, "या चित्रपटाची कथा मला खूप आवडली होती. मला केवळ भाषा येत नाही. यामुळे हा चित्रपट माझ्या हातून जाऊ नये यासाठी मी संपूर्ण महिनाभर ही भाषा शिकली. मुंबईत अनेक वर्षं राहात असल्याने मला ही भाषा शिकणे कठीण गेले नाही. आता मी मराठीत खूप चांगले बोलू शकतो." या चित्रपटात गुलशनसोबत कोण झळकणार हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.  


 
Web Title: In the Marathi film Gulshan Devayya Daav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.