'Loves to smile at others' face' - Priyadarshan Jadhav | ‘दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायला आवडते’- प्रियदर्शन जाधव

अबोली कुलकर्णी

अनेक चित्रपट, मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव लवकरच कलर्स मराठीवर ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्याच्यासोबत मारलेल्या या गप्पा...

*  ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’ या कार्यक्रमाच्या नव्या कन्सेप्टविषयी काय सांगशील?
- ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’ या कार्यक्रमात मी संदीप पाठक सोबत मिळून सुत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडतो आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना नक्कीच आव्हानात्मक वाटते आहे. आम्ही आत्तापर्यंत अनेक ठिकाणी एकत्र काम केलं आहे. पण, होय, पुन्हा एकदा त्याच्यासोबत सुत्रसंचालकाची भूमिका पार पाडायला मजा येणार आहे. टेलिव्हिजनवर जशा पद्धतीने मनोरंजन केलं जातं यासर्वांचा विचार करूनच या शोची स्क्रिप्ट तयार करण्यात आली आहे. अवधूत गुप्ते हे या शोसाठी जज किंवा परीक्षक नसणार आहेत. तर त्यांची केवळ उपस्थिती या शोमध्ये असणार असल्याचे कळतेय. ३१ जुलैपासून दर सोमवार ते गुरूवार रात्री ९ वाजता हा शो सुरू होणार आहे, शो रंजकदार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. बाकी सर्व प्रेक्षकांवर आधारित आहे. 

*  संपूर्ण देशात जीएसटी लागू करण्यात आले आहे. तर ‘जीएसटी’ चा कोणता अर्थ या शोमधून उलगडणार आहे?
- या नव्या शोसाठी जीएसटीचा अर्थ आम्ही ‘गायब सगळं टेन्शन’ असा घेतला आहे. ही नवी कन्सेप्ट प्रेक्षकांसाठी कलर्स मराठीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या धकाधकीच्या आयुष्याला विनोदाची झालर देण्याचा या माध्यमातून आमचा प्रयत्न असणार आहे. 

* लोकांना हसवणं हे खूप कठीण काम असतं, यासाठी तू काय तयारी केली आहेस?
- खरंतर सध्या लेखकाची जबाबदारी खूप मोठी आहे. प्रहसन हे पेपरवर अत्यंत स्ट्राँग पद्धतीने लिहिले गेले पाहिजे. नटाच्या बाबतीत विचाराल तर, लोकांना हसवण्यासाठी अगोदर स्वत:वर थोडंंसं हसायला हवं. दुसऱ्यावर विनोद करणं ही आपल्याला खूप सोपी गोष्ट वाटते. पण, स्वत:वर हसत हसत विनोद पुढे न्यायचा असतो. यातून एक समाधानही असतेच. आपण समोरच्या व्यक्तीला हसवतो आहे. यापेक्षा अजून दुसरा आनंद तो काय? पण नट म्हणून अक्षरश: कस लागतो. तुम्हाला केवळ १० मिनीटांचे स्किट दिसत असेल पण त्यासाठी आम्ही प्रचंड रिहर्सल घेत असतो. मात्र, शेवटी ही प्रक्रिया म्हणजे अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शनचा भाग आहे. माझ्या अ‍ॅक्शनवर समोरच्या व्यक्तीची रिअ‍ॅक्शन अपेक्षित असते.

* संदीप पाठक यांच्यासोबतचं तुझं टयुनिंग कसं आहे?
- संदीप पाठक माझा खूप जुना मित्र. आम्ही एकत्र खूप काम केलं आहे. आता एवढं काम एकत्र केलं की, आमच्यातल्या या ट्युनिंगचाही आम्हाला कंटाळा येऊ लागला आहे. पण, हो, मी संदीपला २००६-०७ पासून ओळखत असेन. आम्ही ‘टाईमपास २’,‘घडलंय बिघडलंय’ यात एकत्र काम केलं आहे. 

* तू मराठी चित्रपट इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मीडियात काम करायचास. मीडियातून तू अभिनयाकडे कसा वळलास?
- मी अभिनयापासूनच खरंतर सुरूवात केली होती. पण एक काळ असा होता की, मला मीडियामध्ये काही दिवस नोकरी करावी लागली. या क्षेत्रातील अनेकांचा मी आभारी आहे. पत्रकारिता करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. पत्रकारिता म्हणजे तत्त्वांची गोष्ट आहे. त्यामुळे पत्रकारिता करणाऱ्यांना खरंच माझा सलाम. ते फारच उत्तम काम क रत आहेत, त्यांचा प्रवास असाच सुरू असू दे.

* सेटवर एखाद्या गोष्टीवरून तुमचे एकमेकांसोबत वाद होत असतील. तुम्ही हे सगळं कसं सांभाळता?
- नक्कीच होतात. आणि ते व्हायलाही हवेत. एखादा मुद्दा पटला नाही तर मी भांडतो. अनेक तासांच्या रिहर्सलमध्ये आम्हाला केवळ तेवढाच एक निवांतपणा असतो. त्यामुळे मला मुळातच भांडायला खूप आवडतं. माझे मित्र समीर चौगुले आणि संदीप पाठक यांच्यात सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या भांडणांची मी मस्त मजा घेत असतो. 

* टीव्ही , चित्रपट या दोन्ही प्रकारांमध्ये काम केलं आहेस. कुठल्या प्रकारांत तू स्वत:ला जास्त कम्फर्टेबल मानतोस?
- चित्रपट या प्रकारांतच अर्थात मी स्वत:ला कम्फर्टेबल मानतो. लहानपणापासूनच मी स्वत:ला चित्रपटांमध्ये काम करतानाचं स्वप्न पाहिलं आहे. 

* वेबसीरिजमध्ये काम करायला बरेच मराठी कलाकार तयार होत आहेत. तुला आवडेल का वेबसीरिजमध्ये काम करायला?
- वेबसीरिजमध्ये काम करण्यापेक्षा मला वेबसीरिजचे दिग्दर्शन आणि निर्मिती करायला जास्त आवडेल. पण, सध्या माझ्याकडे वेळ नाही. 

* ‘टाईमपास’ या चित्रपटाचे तू लेखन केले आहेस. आता एखाद्या चित्रपटाचे लेखन करण्याचा विचार आहे का? 
- माझा एक ‘जीआर’ नावाचा चित्रपट नुकताच लिहून झाला आहे. पाहूयात, नव्या कन्सेप्टसह येणाऱ्या  या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते !

* आगामी प्रोजेक्टसबद्दल काय सांगशील?
- माझे ‘सायकल’, ‘दिप्ती’ आणि ‘हलाल’ नावाचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे. 
Web Title: 'Loves to smile at others' face' - Priyadarshan Jadhav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.