Look at Tejaswini Pandit's lazarwali garba step | ​तेजस्विनी पंडितची ही लुझरवाली गरबा स्टेप नक्कीच पाहा

नवरात्र सुरू झाल्यामुळे सगळीकडेच आता गरबाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक जण कुठे गरबा खेळायचा जायचे, यावेळी कोणती वेगळी डान्स स्टेप करायची याची आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करत आहे. या गरब्याच्या रंगात आता मराठी कलाकार देखील रंगले आहेत. तेजस्विनी पंडितने तिच्या गरबा स्टेपचा एक अफलातून व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला असून या व्हिडिओची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काहीच तासांत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तेजस्विनीने पोस्ट केलेल्या व्हिडिओत तेजस्विनी एका व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना आपल्याला दिसत आहे. ती बाहेर आल्यानंतर एक रिपोर्टर नवरात्रीबाबत तिला एक बाईट द्या असे सांगत आहे. तर त्यावर बाईट सोडून आता काही तरी वेगळा विचार करा असे ती त्यांना सांगत अचानक नाचायला लागते. एक सेकंद काय होते हे आपल्याला देखील कळत नाही आणि तेजस्विनी गरबा स्टेप करताना दिसते. ही गरबा स्टेप झाल्यावर ती आपल्याला सांगते, ही गरबा स्टेप मी युट्युबला पाहिली होती. गरबा करणारी व्यक्ती गरबा करतेय की भांगडा हेच मला ही स्टेप पाहून कळले नव्हते. पंजाब आणि गुजरात या दोन्ही राज्याचा मेळ त्या व्यक्तिने त्या स्टेपमध्ये घातला होता. ही स्टेप पाहून मला खूपच आश्चर्य वाटले होते. ती एक लुझरवाली गरबा स्टेप होती असे मी नक्कीच म्हणेन. तुम्ही देखील तुम्ही पाहिलेल्या एखाद्या अशा स्टेपचा व्हिडिओ अपलोड करा आणि त्याला लुझरवाली गरबा स्टेप असा हॅशटॅग द्या. 

Also Read : 'तेजस्विनी' पंडीतची बातच न्यारी


तेजस्विनीने लुझरवाली गरबा स्टेपसाठी मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांना देखील आव्हान केले आहे. सिद्धार्थ जाधव आणि नम्रता आवडे या तिच्या मित्रमैत्रिणींनी देखील अशा एखाद्या स्टेपवर नाचून व्हिडिओ अपलोड करा असे तिने त्यांना या व्हिडिओद्वारे सांगितले आहे. तेजस्विनीच्या आव्हानावर आता हे दोघे त्यांचा गरबा स्टेपचा व्हिडिओ कधी अपलोड करतात याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 
तेजस्विनीने हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काहीच तासात २३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

 
Web Title: Look at Tejaswini Pandit's lazarwali garba step
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.