Learn about the special things of Nilul Phule | जाणून घ्या निळू फुले यांच्या खास गोष्टी

ना गब्बर सारखी बडबड, ना मोगॅम्बोसारखी आरडाओरड... मात्र त्यांच्या आवाजात होता भारदस्तपणा.घोगर्‍या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्‍या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भितीच्या कवेत घेऊन यायचा.निळू भाऊ अर्थात निळू फुले यांच्या असामान्य अभिनय क्षमतेची ओळख.त्यांची बेरकी नजर प्रेक्षकांच्याही आरपार जायची. हीच नजर, सूचक हावभाव आणि संवाद हे निळू फुले याचं खरं बलस्थान. तसेच मराठी सिनेमाचा खलनायक म्हटला की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे निळू फुले यांचा.


अनेक नाटक आणि सिनेमात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या...सिंहासनमधला पत्रकार आणि विनोदी भूमिका त्यांनी वठवल्या... मात्र त्यांचा खलनायकच रसिकांना भावला..

त्यांच्या सिनेमात एकतरी बलात्काराचा सीन असायचाच. यावर विनोद करताना निळू फुले म्हणायचे, कथा तिच, बलात्कारही तोच, बाई हि तिच,..... कमीत कमी तिची साडी तरी बदला. "

त्यांनी अनेक हिंदी सिनेमातून रसिकांची मनं जिंकली.. मेरी बिवी की शादी, वो सात दिन, सारांश, कुली अशा एकाहून एक सरस सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिका नायका इतक्याच प्रसिद्ध झाल्या. मात्र निळूभाऊ इथं जास्त रमले नाहीत...

निळूभाऊंना बॉलिवूडमध्ये नसिरुद्दीन शहा यांचा अभिनय आवडायचा.. मात्र खुद्द नसिरूद्दीन शहा निळू फुलेंच्या अभिनयावर फिदा होते..त्यांनी निळू फुलेंना हॉलीवुड सिनेमाची ऑफरही दिली होती.


1996 नंतर निळूभाऊंनी सिनेमात जवळजवळ निवृत्ती स्वीकारली. मात्र जीवनाच्या अखेरच्या क्षणी गोष्ट छोटी डोंगराएवढी सिनेमातल्या छोट्याशा भूमिकेतून त्यांनी रसिकांच्य डोळ्यात पाणी आणलं...

काकांच्या घरी असणा-या ग्रामोफोनमुळं निळूभाऊंना त्या काळातलं नाट्यसंगीत आवडायचं. त्यातून त्याच्यांत गायनाची आवड निर्माण झाली.. मात्र गायक बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.


समाजासाठीच कला ही शिकवण त्यांनी आयुष्यभर जोपासली. सेवादलाच्या कलापथकात काम करीत असताना आपल्या नोकरीच्या कमाईतील १० टक्के वाटा समाजासाठी, सेवादलाच्या उपक्रमांसाठी देण्याचा नियम त्यांनी कसोशीने पाळला. पुढेही नाटके, चित्रपट यांच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता निधी उभा केला... आजही त्यांचं हे कार्य त्यांच्या संस्थेमार्फत सुरु आहे...हे निळूभाऊंच्या अभिनय कौशल्याचं मोठेपणच म्हणावं लागेल... 

कसदार अभिनेता, सामाजिक बांधिलकी असणारा सच्चा कार्यकर्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूसपण जाणणारा-मानणारा आणि ते जपणारा एक साधा पण असामान्य माणूस ! असं त्यांचं वर्णन केल्यास वावगं ठरणार नाही....समाजाचे ऋण मानणार्‍या, माणुसकी जपणार्‍या, संवेदनशील अशा या ज्येष्ठ कलाकारानं १३ जुलै २००९ रोजी जगाचा निरोप घेतला.. मात्र आपल्या कार्यानं निळूभाऊंनी समाजाला नवा रस्ता दाखवलाय.
Web Title: Learn about the special things of Nilul Phule
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.