Launch the teaser of Hampi film directed by Prakash Kunte | ​प्रकाश कुंटे दिग्दर्शित हंपी चित्रपटाचा टीझर लाँच

कर्नाटकातलं हंपी हे गाव आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल. मात्र, प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचे नावच 'हंपी' आहे. स्वरूप समर्थ एन्टरटेन्मेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चैतन्य गिरीश अकोलकर यांनी प्रस्तुती केली आहे. दिवाळीनंतर ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. 
या टीझरमध्ये अभिनेता प्रियदर्शन जाधव कन्नड रिक्षावाल्याच्या भूमिकेत दिसत असून तो वेलकम टू हंपी असे म्हणताना आपल्याला दिसत आहे. अत्यंत मजेशीर अशा या टीझरने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अभिनेता ललित प्रभाकर अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एका मुलीचा भावनिक प्रवास या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अदिती मोघेचे असून सिनेमॅटोग्राफर म्हणून अमलेंदू चौधरी यांनी या चित्रपटाचे काम पाहिले आहे.

प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची जोडी प्रेक्षकांना जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा हंपी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची जोडी जमली आहे तर अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अशी हटके जोडी देखील प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
प्रकाश कुंटेने या पूर्वी कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके असे उत्तम चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे हंपी या चित्रपटातून प्रकाश पुन्हा नवे काहीतरी घेऊन येणार हे नक्की!
दिग्दर्शक प्रकाश कुंटेच्या हंपी या चित्रपटाप्रमाणेच त्याचा सायकल हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. नुकतेच त्याच्या या चित्रपटाला कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या चित्रपटात भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Also Read : सायकल चित्रपटाचे पोस्टर झाले प्रदर्शित
Web Title: Launch the teaser of Hampi film directed by Prakash Kunte
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.