Launch the movie trailer for 'I have no problem' | ​'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवी सिंग तर दिग्दर्शक समीर विद्वांसबरोबरच चित्रपटातील कलाकार स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, विजय निकम, सीमा देशमुख, स्नेहलता वसईकर आणि मास्टर आरश गोडबोले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. चित्रपटातील कलाकारांसोबतच संगीतकार तिगडीमधील ह्रषिकेश आणि जसराज ही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल यांनी मराठी चित्रपट बनवण्यामागचा त्यांचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, “मुंबई(महाराष्ट्र) ही माझी कर्मभूमी असून मी त्याचे देणे लागतो आणि म्हणून मी माझा पहिला हिंदी चित्रपट ‘डोंगरी का राजा’ नंतर पंजाबी सिनेमा न बनवता मराठी चित्रपट बनवला.
या चित्रपटात निर्मिती सावंत, मंगल केंकरे, ज्येष्ठ रंगकर्मी सतिश आळेकर कमलेश सावंत आणि डॉ. साहिल कोपर्डे यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. बऱ्याच हिट मालिका प्रेक्षकांसमोर आणणारे दिग्दर्शक विनोद लव्हेकर समीरच्या चित्रपटात अभिनय करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने सतत मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत आपल्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरूणाईचे प्रॉब्लेम्स आणि त्यावर कसा तोडगा ही तरूणाई काढू शकते याचं चित्रण मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
समीर विद्वांस दिग्दर्शित या सिनेमाची कथा निर्माते रवी सिंग यांची असून पटकथा आणि संवाद कौस्तुभ सावरकर यांनी लिहिले आहेत. त्याला साजेसं संगीत ह्रषिकेश-सौरभ-जसराज यांनी दिलं आहे. गुरू ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, अभय जोधपूरकर, श्रृती आठवलेबरोबरच संगीत दिग्दर्शक जसराज जोशी यांचे सुमधूर स्वर लाभले आहेत.
तेव्हा आपले प्रॉब्लेम्स सोडवायला नक्की पहा 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' येत्या ११ ऑगस्टला...

Also Read : दिग्दर्शक विनोद लव्हेकरची नवी इनिंग
Web Title: Launch the movie trailer for 'I have no problem'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.