Know what Nagraj Manjule has to say about Sairat's remake | जाणून घ्या नागराज मंजुळेचे काय म्हणणे आहे सैराटच्या रिमेकबाबत

सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाने मराठी चित्रपटांचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. आजवर सर्वात जास्त गल्ला जमवणारा हा मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले असून या चित्रपटात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील सगळेच कलाकार हे नवीन असले तरी या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटाची चर्चा मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील झाली होती. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला जाणार आहे आणि हा रिमेक बॉलिवूडमधील आजचा आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर बनवत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सैराटच्या या हिंदी रिमेकची सध्या चांगलीच चर्चा आहे. या रिमेकसाठी करण आणि त्याची टीम प्रचंड मेहनत घेत आहे. मराठी चित्रपटाइतकेच यश या हिंदी रिमेकला मिळाले पाहिजे यासाठी ही टीम प्रयत्न करत आहे. नागराज मंजुळेचा या हिंदी रिमेकशी काहीही संबंध नसल्याचे त्याने नुकतेच सांगितले आहे. नागराज हा उत्कृष्ट दिग्दर्शक असल्याचे आपणा सर्वांनाच माहीत आहे. दिग्दर्शनानंतर तो आता अभिनयक्षेत्राकडे वळला आहे. द सायलेन्स या चित्रपटात तो अंजली पाटील, रघुवीर यादव आणि कादंबरी कदम यांच्यासोबत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आला. त्यावेळी नागराज आवर्जून उपस्थित होता. यावेळी पत्रकारांनी त्याला सैराटच्या रिमेकबद्दल विचारले असता सैराटच्या रिमेकमध्ये मला काहीही रस नसल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, मी माझा चित्रपट बनवला आहे आणि त्याला चांगले यश देखील मिळाले आहे. सैराटच्या रिमेकशी माझा काहीही संबंध नाही. ते त्यांचा चित्रपट बनवत आहेत आणि ते चांगलाच चित्रपट बनवतील अशी मला खात्री आहे. मी कधीही या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील गेलेलो नाही. 

Also Read : जान्हवी कपूरमुळेच नागराज मंजुळेने करण जोहरला मदत करण्यास दिला नकार!
Web Title: Know what Nagraj Manjule has to say about Sairat's remake
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.