'The key to the appreciation of the audience' is important '- Saksh Patil | ‘रसिक प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप महत्त्वाची’ - सचित पाटील

अबोली कुलकर्णी

‘क्लासमेट्स’,‘क्षणभर विश्रांती’,‘झेंडा’,‘साडे माडे तीन’, ‘अर्जुन’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात झळकलेला चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सचित पाटील याने आता छोट्या पडद्यावर तब्बल १३ वर्षांनंतर कमबॅक केले आहे. कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत सचित ‘प्रेम’ या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या निमित्ताने आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीबाबतच्या त्याच्यासोबत मारलेल्या या गप्पा...

* ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेद्वारे प्रेम नावाच्या मुख्य भूमिकेतून तू १३ वर्षांनंतर छोट्या स्क्रीनवर कमबॅक करत आहे काय सांगशील?
- नक्कीच. मला खूप छान वाटतंय. मी माझ्या लाडक्या आणि माझ्यावर भरभरून प्रेम करणाºया प्रेक्षकांच्या भेटीला या निमित्ताने आलो आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. मालिकेचा स्विकार करण्याअगोदर मला सातत्याने मराठी चित्रपटांच्या आॅफर्स येत होत्या. मात्र, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेची कथा मला मनापासून आवडली त्यामुळे मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला.

* राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका का स्वीकारली?
- कोणतीही मालिका स्विकारण्यापूर्वी त्या मालिकेचे लेखन, संवाद कुणी लिहिले आहेत हे मी प्रक र्षाने पाहतो. या मालिकेसाठी लिहिण्यात आलेले संवाद हे खूपच सुंदर आहेत. प्रेक्षक या संवादांच्या प्रेमात पडले नाही तर नवलच. अत्यंत साधी, सरळ, आपल्यातली वाटणारी सगळी पात्रं आणि कथानक यांच्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना भावते आहे. 

* प्रेमच्या भूमिकेविषयी काय सांगशील? काय वेगळेपण आहे?
- खरं सांगायचं तर, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ ही मालिका दोन भिन्न संस्कृतींचे मिलन असणारी आहे. यातील माझी व्यक्तिरेखा प्रेम देशमुख हा एक महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय असा बिझनेसमॅन आहे. ७०० कोटींचा मालक असलेल्या या प्रेमला ‘प्रेम’ करणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं वाटतं. त्याने तयार केलेले नियम सर्वांनी पाळायला हवेत, त्याचा शब्द हा शेवटचा असेल असे अलिखित नियमांसाठी सर्वांनी दक्ष राहायला हवे असे त्याचे म्हणणे असते. अशा प्रेमच्या आयुष्यात जेव्हा राधा सारखी शिक्षिका असलेली मुलगी येते तेव्हा त्याच्या आयुष्यात काय काय बदल होतो हे पडद्यावर पाहणंच योग्य ठरेल. 

* सचितला प्रेमकडून काय शिकायला मिळालं?
- सचित पाटील आणि प्रेम देशमुख हे दोघेही एकमेकांपेक्षा अगदीच वेगळे आहेत. मात्र, मला प्रेमकडून त्याची निर्णय घेण्याची पद्धत, त्याचा त्याच्या निर्णयांवर असलेला ठामपणा आवडला. तो त्याच्या आई, बहिणींसोबत जसा वागतो तेही शिकण्यासारखे आहे. एकंदरितच काय, तर मला या मालिकेची थीमच खूप भावली. यातील प्रत्येकच कॅरेक्टर आपल्याशी खूप साधर्म्य सांगणार आहे.

* प्रेमच्या आईच्या भूमिकेत कविता लाड आहेत. कसा आहे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव ?
- कविता लाड यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. आम्ही एक मेकांचे काम पाहिले आहे. मात्र, आम्ही एकमेकांसोबत प्रथमच काम करत आहोत. खरं सांगायचं तर मालिकेतील सर्वच कलाकार अर्चना गुरव, गौतम जोगळेकर, विद्या करंदीकर यांच्याप्रमाणे इतरही सर्वजण आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे सेटवर राहतो. एकमेकांसोबत काम करताना खूप धम्माल येते.

* तुमच्या मालिकेचे शीर्षक गीत राजेश मापुसकर यांनी दिग्दर्शित केले. कसा होता अनुभव ?
- अनुभव खूप छान होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्यासोबत मला काम करायचंच होतं. यानिमित्ताने माझी ही इच्छाही पूर्ण झाली. राजेश मापुस्कर मला माणूस म्हणून अधिक भावला. एक दिग्दर्शक म्हणून मी त्यांना कायम कामात व्यग्र असलेलंच पाहिलं. एवढं सगळं काम करत असतानाही कायम चेहºयावर हसू असणं ही खरंच खूप कौतुकाची बाब आहे. त्यांच्याक डून मला बरंच काही शिकायलाही मिळालं. 

* अवॉर्ड मिळणं आणि रसिकांची कौतुकाची थाप मिळणं कोणती गोष्ट तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे?
- अर्थात मायबाप रसिकप्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळणं एखाद्या कलाकारासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. याचा अर्थ असं नाही की, अवॉर्ड मिळणं मला आवडत नाही. कारण, दोन्ही गोष्टी कलाकार म्हणून माझ्यासाठी महत्त्वाच्याच आहेत. रसिकांच्या कौतुकाची थाप मिळाल्यामुळे प्रोत्साहन मिळते.

* आत्तापर्यंत तुम्ही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. काय शिकवलं वेगवेगळया भूमिकांनी?
- प्रत्येक भूमिका, सेट, दिग्दर्शक, सहनिर्माता यांच्याकडून नेहमीच खूप शिकायला मिळतं. माणसाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण एक माणूस म्हणून समृद्ध होतो. खूप छान वाटतं जेव्हा असं काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तेव्हा.

* वेबसीरिजचा एक ट्रेंड सध्या इंडस्ट्रीत सुरू आहे. काम करायला आवडेल का?
-  एखाद्या माध्यमांत ठरवून काम करायचं आणि एखाद्या नाही असं मी कधीच करत नाही. मी नाटक, मालिका, चित्रपट सगळ्या माध्यमांमध्ये काम केले आहे आणि करत आहे. त्यामुळे नक्कीच वेबसीरिजमध्येही मला काम करायला मिळालं तर आनंदच आहे. फक्त लेखन, दिग्दर्शक आणि निर्माता या त्रयी चांगली असेल तर मी कुठल्याही वेळी काम करायला तयार असेन.

*  आगामी प्रोजेक्टसबद्दल काय सांगाल?
- ‘विठ्ठल’ हा माझा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. सध्या माझे लक्ष राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेवरच जास्त आहे. अजून दोन ते तीन सिनेमांच्या निर्मात्यांशी बोलणी सुरू आहेत. त्यांच्या माध्यमातून पुन्हा लवकरच रसिकांच्या भेटीला येईल.
Web Title: 'The key to the appreciation of the audience' is important '- Saksh Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.