Kavdar Kadam, Bharat Ganeshapure, Hrishikesh Joshi, who played the lead role of Vaghera | किशोर कदम, भारत गणेशपुरे , हृषिकेश जोशी यांची मुख्य भूमिका असलेला वाघेऱ्या

एप्रिल महिन्याची सुरुवात म्हटली कि 'एप्रिल फुल' ला उधाण येते. एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात हास्याचा पाऊस पाडणाऱ्या या 'फुल'ची मज्जा प्रत्येकजण घेत असतो. हीच मज्जा घेऊन मराठीतील काही दिग्गज कलाकार खास एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांसमोर येत आहे. माणसांना रडवणे खूप सोपे असते, मात्र हसवणे त्याहून कठीण. म्हणूनच तर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी विनोदवीरांना अनेक मशागत करावी लागते. मायबाप प्रेक्षकांच्या एका हसूसाठी आपल्या दर्जेदार अभिनयाद्वारे विनोदाचा स्तर उंचावणारे असे अनेक दिग्गज कलाकार आपल्याला मराठीत पाहायला मिळतात. अशा या सर्व भन्नाट विनोदवीरांचा बंपर पॅकेज असलेला 'वाघेऱ्या' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शन निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी केले आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या चित्रपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे , हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम यांसारख्या अनुभवी आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची चटकदार मेजवानी देण्यास येत असलेल्या या सिनेमाचे राहुल शिंदे आणि केतन माडीवाले निर्माते आहेत.
नाटक, मालिका आणि चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना लोटपोट हसवणारे हे विनोदवीर प्रथमच 'वाघेऱ्या' या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले असल्यामुळे, या सिनेमाद्वारे विनोदाचा वारू चौफेर उधळणार हे निश्चित!  
समीर आशा पाटीलने आजवर चांगले अनेक चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे त्याच्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना चांगल्याच अपेक्षा लागलेल्या असतात. त्याचा चौर्य हा रहस्यपट होता. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा यंटम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात एक लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पहिल्यांदाच समीर आशा पाटील एका कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे. 


Also Read : ​ ‘ओढ’ मध्ये भारत-शशिकांतची जुगलबंदी
 
Web Title: Kavdar Kadam, Bharat Ganeshapure, Hrishikesh Joshi, who played the lead role of Vaghera
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.