Interview: Not to get theater in Marathi films: Unfortunately, Ameya Wagh! | ​Interview : मराठी चित्रपटांना थिएटर न मिळणे हे मोठे दुर्दैवच : अमेय वाघ !

-रवींद्र मोरे 
फास्टर फेणे, मुरंबा, शटर, पोपट, आईचा गोंधळ आदी मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अमेय वाघचा सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास अतिशय इंटरेस्टिंग आहे. अमेयचे एक नाटक सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहे. आपल्या करिअरची सुरुवात नाटकापासून करणाऱ्या अमेयला वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात आॅफर मिळत आहेत. त्याच्या या प्रवासाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी अमेयशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!

* तुझ्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाबद्दल काय सांगशिल?
- हे नाटक निर्मितीचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. दिल दोस्ती दुनियादारी हे नाटक करत असतानाच आम्ही ठरविले होते की, आपणच का एखादे वेगळ्या धाटणीच्या नाटकाची निर्मिती करावी. त्यावेळी आम्हाला बºयाच व्यावसायिक नाटकांचीही आॅफर मिळत होती, मात्र आमच्या मनासारखे नाटक नव्हते. सध्याच्या काळाची गरज ओळखून आम्ही नाटक निर्मितीचे ठरविले आणि त्यासाठी कला कारखाना नावाची संस्थाही रजिस्टर केली. ठरलेल्या नियोजनानुसार सुनील बर्वे यांच्या सहनिर्मितीच्या साह्याने नाटक रचले गेले. आतापर्यंत या नाटकाचे १७० हून अधिक प्रयोग झाले असून प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. 

* या नाटकाचे वेगळेपण काय आहे?
- आजपर्यंत जे नाटक बनलेले आहेत त्यापैकी बहुतांश नाटके कौटुंबिक आणि ४० वर्षावरील वयोगटासाठी बनलेले आहेत. तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून खूपच कमी नाटकांची निर्मिती झाली आहे. हे नाटक विशेष तरुणाईवर आधारित असून त्यात लव्ह स्टोरीही दाखविण्यात आली आहे. तरुण प्रेक्षकांना आकर्षित करण्याची किमया या नाटकात असल्याने हे नाटक अख्ख्या तरुणाईच्या पसंतीस उतरत आहे. 

* नाटक ते सिनेमापर्यंतच्या तुझ्या प्रवासाबाबत काय सांगशिल?
- लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिवाय माझ्या अभिनयाची सुरुवातच बालनाट्यापासून झाली. कॉलेजियन लाइफमध्ये इंटर कॉलेज नाटक करु लागलो. त्यानंतर व्यावसायिक नाटके, मालिका आणि मग सिनेमा मिळत गेले. एकंदरीत या क्षेत्रात काम करताना स्वत:ला अपडेट ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.  

* हिंदी चित्रपटांच्या तुलनेने मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत, याबाबत काय सांगशिल?
- ही फारच दुर्दैवाची बाब आहे की, महाराष्ट्रातच मराठी आपल्या मराठी कलाकरांना मराठी चित्रपटासाठी थिएटर मिळत नाही, ते मिळविण्यासाठी वाट पाहावी लागते, संघर्ष करावा लागतो. मान्य आहे की, हिंदी चित्रपटांच्या तुलनेने थिएटर चालकांना मराठी चित्रपटांच्या माध्यमातून कमी पैसा मिळतो, मात्र मराठी चित्रपट निर्मात्यांना आर्थिक मर्यादा आहेत, हे ओळखून मराठी चित्रपटांना न्याय देऊन आपली मराठी संस्कृती जपली गेली पाहिजे. 

* वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटांनाही विरोध होताना दिसतो, तुझे काय मत आहे?
- याबाबतीत कायद्याची पायमल्ली होता कामा नये. ज्या चित्रपटाला कायदेशीररित्या सेंसॉर बोर्डाने मान्यता दिली तर त्याला विरोध होऊन नये, असे माझे मत आहे. चित्रपटाला सेंसॉरची मान्यता मिळूनही विरोध करणे म्हणजे कायद्याच्या विरोधात जाणे होय. आज समाजात वेगवेगळ्या गटाचे, समुहाचे लोक राहतात, भावना दुखावणं साहजिकच आहे, मात्र खरोखरच भावना दुखावल्या जातात का? की फक्त लोकप्रियतेसाठी विरोध केला जातो, याचाही विचार व्हायला हवा.

* अभिनय क्षेत्रात येणाऱ्या कलाकारांना काय संदेश देशिल?
- सध्या या क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप चांगला काळ आहे. नाटक, सिनेमा यांत वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. मात्र पैसा आणि प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय किंवा हे आकर्षण नसावे. अभिनय हे आपले कर्म समजून येत असाल तर पैसा आणि प्रसिद्धी ही आपोआपच मिळते. 
Web Title: Interview: Not to get theater in Marathi films: Unfortunately, Ameya Wagh!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.