विविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास!-सई ताम्हणकर

By अबोली कुलकर्णी | Published: October 19, 2018 06:55 PM2018-10-19T18:55:43+5:302018-10-19T18:57:07+5:30

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीसह सर्व प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आत्तापर्यंत अनेक व्यक्तिरेखा तिने भूमिकांमधील नाविण्य शोधून साकारल्या. विविधांगी भूमिका करण्यावर तिचा कायम भर असतो. साध्या, सोज्वळ भूमिकांसोबतच ग्लॅमरस असा प्रवासही तिने केला. आता ती एक नवं क्षेत्र पादाक्रांत करू इच्छिते.

I like to play different kind of characters -Sai Tamhankar | विविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास!-सई ताम्हणकर

विविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास!-सई ताम्हणकर

googlenewsNext

अबोली कुलकर्णी

    अष्टपैलू भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीसह सर्व प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आत्तापर्यंत अनेक व्यक्तिरेखा तिने भूमिकांमधील नाविण्य शोधून साकारल्या. विविधांगी भूमिका करण्यावर तिचा कायम भर असतो. साध्या, सोज्वळ भूमिकांसोबतच ग्लॅमरस असा प्रवासही तिने केला. आता ती एक नवं क्षेत्र पादाक्रांत करू इच्छिते. झी ५ वाहिनीवरील ‘डेट विथ सई’ या कार्यक्रमातून ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहे. यात ती अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस करताना आपल्याला दिसणार आहे. या शोच्यानिमित्ताने तिच्याशी साधलेला हा संवाद...
                                                          
* ‘डेट विथ सई’ या वेबसीरिजमधून तू डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहेस. काय सांगशील शोविषयी?
- होय, मी या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत असल्याने मला प्रचंड आनंद होतोय. काही काळानंतर तुमचं नाव असलेला शो तुम्हाला मिळणं हे खरंतर खूपच इंटरेस्टिंग वाटतं. ड्रामा या झोनमध्ये मोडणारा हा शो आहे. यात मी माझीच भूमिका करतेय. यात बरेचसे अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस आहेत. माझं स्वप्न होतं की, एखाद्या तरी शोमध्ये मी अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस करावेत. त्यामुळे मी प्रचंड खूश आहे. 

*  तू शोसाठी कोणती तयारी केलीस? शोच्या बाबतीत कोणती आव्हानं तुझ्यासमोर आहेत? दडपण येतं का? 
- नाही, दडपण येत नाही. कारण आता इंडस्ट्रीत एवढी वर्ष झाली आहेत. त्यामुळे  कोणताही नवा प्रोजेक्ट करताना नर्व्हसनेस तर असतो. शोबद्दल आणि आपल्या कामाबद्दल विशेष उत्सुकता असते. तयारी तर प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेस करावीच लागते. पण, वेगळया शोसाठी काम करायला मजा येतेय.

* शोचे वेगळेपण काय सांगशील? 
- शोचे वेगळेपण म्हणाल तर झी ५सोबत मी प्रथमच ही वेबसीरिज करतेय. वेगळया प्रकारातील हा शो असून मराठीत तयार होणारी ही वेबसीरिज कमालीची प्रभावी ठरणार आहे.

* तू एक स्टेट लेव्हल कब्बडी प्लेयर होतीस. मग अभिनयाची बीजं केव्हा पेरली गेली?                 
- होय. अजूनही मी एखादा सामना बघत असेल तर माझे हात-पाय शिवशिवतात. मी तिथे खेळल्याशिवाय राहत नाही. अभिनयाची बीजं मी राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेऊन काम करायला सुरूवात केली तेव्हा पेरली गेली. तेव्हापासून मला अभिनयाची आवड लागली. मग माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.                                            

* तू आत्तापर्यंत एकदम हटके भूमिका केल्या आहेस. अशा भूमिका निवडताना कोणता एक विचार तुझ्या मनात  कायम असतो?
- वेगळे काहीतरी करण्याचा माझा विचार असतो. मी नेहमी एखादा प्रोजेक्ट स्विकारताना असा विचार करते की, यातून मला काय नवीन शिकायला मिळणार आहे? माझी प्रत्येक भूमिका ही एकमेकींपेक्षा अगदी वेगळी असते. 

* आत्तापर्यंतचा प्रवास किती समृद्ध करणारा होता?
- खरं तर, मी बरीच माणसं कमावली. या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं. या प्रवासात असे काही कटू अनूभव आले की, ते माझ्यासाठी कायम दिशादर्शक ठरले. मला काय करायचं नाहीये, हे मला या अनुभवांकडे पाहिलं की जाणवतं. 

* ‘वजनदार’साठी तू वजन वाढवलेस, नंतर घटवलेस. मग पुन्हा तू तुझ्या ओरिजनल फिगरमध्ये आलीस. तुझा फिटनेस मंत्रा काय?
- ‘सगळं खा आणि भरपूर व्यायाम करा’ हा मंत्रा मी फॉलो करते. तुमच्या आरोग्याबद्दल कुठलेही निर्णय इतके फास्ट घेणं टाळावं. कारण, शरीर आणि आरोग्य हे तुम्हाला एकदाच मिळते. ते टिकवणं तुमच्या हातात असते. कोणतेही शॉर्टकटस किंवा क्रॅश कोर्स वजन घटवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी करू नयेत, ते घातक ठरू शकतात.                                                    

* दिग्दर्शन किंवा निर्मिती या क्षेत्रात येण्याचा विचार आहे का?
- नाही. सध्या तरी तसा कुठलाही विचार नाही. मला असं वाटतं की, एक कलाकार म्हणून माझं बरंच काही शिकायचं राहून गेलं आहे. अगोदर मी ते पूर्ण करीन आणि नंतरच मग मी या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा विचार करीन.

* ‘मीटू’ प्रकरणांवरील तुझं वक्तव्य बरंच गाजतंय. काय सांगशील?
- बदल होतोय. नव्या काळासह होणारा हा बदल प्रत्येकाने स्विकारायला हवा. महिला बोलत आहेत, ही एक चांगली बाब आहे. प्रत्येक महिलेला कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणं अपेक्षित असतं. 

* तुला कधी अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं का?
- सुदैवाने नाही. मला आलेल्या एका कॉलला मी सडेतोड उत्तर दिल्याने नंतर मला अशा कुठल्याही प्रसंगाचा सामना करावा लागला नाही.

* इंडस्ट्रीतील हे गैरप्रकार थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, असं तुला वाटतं?
- मला असं वाटतं की, हेच व्हायला पाहिजे जे सध्या होतंय. प्रत्येक महिला जिच्यावर अन्याय झाला आहे, तिने बोललेच पाहिजे. त्याशिवाय हे सर्व गैरप्रकार थांबणार नाहीत.
 

Web Title: I like to play different kind of characters -Sai Tamhankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.