Harsh Kulkarni's Marathi debut in 'Chhash Preiti' | 'छंद प्रितीचा' चित्रपटातून हर्ष कुलकर्णीचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण


गेल्या काही दिवसांत तमाशावर आधारित गाणं सिनेमात दिसलं नव्हतं. मात्र आता छंद प्रितीचा या सिनेमातून पुन्हा एकदा मराठी रसिकांना तमाशा पाहायला मिळणार आहे. गावापासून शहरापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं मनोरंजन करणा-या तमाशाचा आनंद रसिकांना या सिनेमाच्या माध्यमातून घेता येणार आहे. सुबोध भावे, सुवर्णा काळे यांच्याबरोबरच नवा चेहरा हर्ष कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती असणाऱ्या लोकसंगीताचा एक भाग म्हणजे शाहीरी कवणं... ज्यांनी एकेकाळी मराठी मनावर राज्य केले मात्र सिनेमाचा विषय बदलत गेला आणि या मराठमोळ्या गीतांची जागा पाश्चिमात्य संगीताने घेतली. मराठीतही हे पश्चिमी वारे वाहू लागले. बराच काळ लोटला आणि पुन्हा एकदा लावणी मराठी सिनेसृष्टीत डोकावली. याच दिशेने एक पाऊल पुढे टाकत प्रेमला पिक्चर्स चे निर्माते चंद्रकांत जाधव यांनी दिग्दर्शक एन. रेळेकर यांच्या साथीने याच कलांची गाथा सांगणारा संगीतमय चित्रपट ‘छंद प्रितीचा’ ची निर्मिती केली आहे.
 
कलेची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटातून हर्ष कुलकर्णी हा नवीन अभिनेता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकगीतांचा वारसा लाभलेल्या या चित्रपटात तो एका शाहीराच्या भूमिकेत दिसणार आहे ज्याच्या शब्दांमध्ये जादू आहे. लावण्या, लोकगीतं, सवाल – जवाब, भावगीतं आणि भक्तीगीतं अशी सगळ्याच प्रकारची काव्य लिहिणारा हा शाहीर... मराठी मुलखात आपलं नाव व्हावं या एका अपेक्षेने तो घरदार सोडून आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर निघतो. या वाटेवर शाहीर सत्यवानासाठी फुलं पेरली आहेत की काटे रोवले आहेत हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
 
एन. रेळेकर यांनी दिग्दर्शनाबरोबरच कथा – पटकथा – संवाद आणि गीतलेखन केले आहे. तर चित्रपटातील महत्त्वाचा भाग म्हणजे संगीत... प्रविण कुंवर यांनी संगीतबध्द केलेल्या गीतांना बेला शेंडे, आदर्श शिंदे, जावेद अली, केतकी माटेगावकर, वैशाली सामंत आणि नंदेश उमप यांचे सुरेल स्वर लाभले आहेत. एकंदर आठ गाण्यांचा हा गुलदस्ता प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यशस्वी होणार असा विश्वास मालिकेच्या टीमने व्यक्त केला आहे.
Web Title: Harsh Kulkarni's Marathi debut in 'Chhash Preiti'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.