'Hard work is not a choice!' - Aishwarya Sonar | ‘हार्डवर्कशिवाय पर्याय नाही!’- ऐश्वर्या सोनार

अबोली कुलकर्णी

मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’च्या निमित्ताने प्रियांका चोप्रा हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटावर प्रेक्षकांनी तुफान प्रेम केलं. आता तिने गिरीधरण स्वामी दिग्दर्शित ‘काय रे रास्कला’ या दुसऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. फॅमिली एंटरटेनर, धम्माल अशा या चित्रपटातून अभिनेत्री ऐश्वर्या सोनार ही अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. ऐश्वर्याने ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटासाठी  ‘असिस्टंट डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले आहे. १४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या  या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही हितगुज....

*  ‘काय रे रास्कला’ बद्दल काय सांगशील? चित्रपटाच्या टीमकडून काही नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या?
- संपूर्ण कुटुंबियांनी जाऊन एकत्र पहावा, असा हा चित्रपट आहे. फॅमिली एंटरटेनर, धम्माल मुव्ही आहे. यातली माझी भूमिका गंभीर आहे. माझ्या एन्ट्रीने कथेला संपूर्णपणे टिवस्ट मिळतो. प्रिती एक करिअर ओरिएंटेड मुलगी असून एका बिझनेसमॅनसोबत तिचे लग्न झालेले असते. तसेच चित्रपटाच्या टीमसोबत काम करायला खुप मजा आली. खास करून निहार गितेसोबत काम करण्याचा अनुभव खुपच मस्त होता. त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. त्याच्यातली एनर्जी पाहून आम्हाला सगळ्यांना कामाचा खूप उत्साह यायचा. 

* ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात तू असिस्टंट डायरेक्टरचं काम पाहिलं आहेस. तू दिग्दर्शनाकडून अभिनयाकडे कशी वळलीस ?
- लहानपणापासूनच मला अभिनयाचे क्षेत्र भूरळ घालते. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटावेळी मला असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहायला मिळालं. ‘काय रे रास्कला’ चित्रपटाच्या निर्मात्या मधू आंटी जेव्हा स्क्रिप्ट वाचत होत्या, तेव्हा त्याच मला म्हणाल्या,‘तू या चित्रपटात एखादा रोल का करत नाहीस? ’ त्यामुळे मग मी या रोलसाठी आॅडीशन दिलं. माझी लूक टेस्ट झाली. खरंतर मी खूप नर्व्हस होते. पण, माझी या रोलसाठी निवड झाली. रोल छोटा असून देखील खूप महत्त्वाचा आहे.

*  दिग्दर्शन आणि अभिनय यापैकी कुठले क्षेत्र तुला जास्त आवडते ?
- अभिनय अर्थातच. मला लहानपणापासूनच अ‍ॅक्टिंग हे क्षेत्र खूप आवडतं. मी अजून शिकतेय. ‘काय रे रास्कला’च्या शूटिंगवेळी मी तास न् तास सेटवर जाऊन बसायची. मला अजून बरंच काही शिकायचंय. पण, ही छोटीशी भूमिका माझ्यासाठी खूप मोठी ठरणार आहे. चित्रपटसृष्टीत ‘हार्डवर्क’ला पर्याय नसतो. तुम्ही मेहनत करायलाच हवी. त्याशिवाय तुमची दखलही कुणी घेत नाही. 

आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील?
- मराठी इंडस्ट्रीचं रूप आता पालटत आहे. खूप मेहनत, सहनशक्ती, संयम असणारा व्यक्तीच येथे काही करू शकतो. मी नशीबवान आहे की, मला माझ्या मेहनतीमुळे ‘व्हेंटिलेटर’ मध्ये असिस्टंट डायरेक्टरचं काम करायला मिळालं. खूप शिकायला मिळालं. आता या चित्रपटातील भूमिकेकडेही मी याच दृष्टीकोनातून पाहते आहे. आता तर माझी सुरूवात झालीय. नक्कीच पुढील प्रवास यशस्वीच आहे.

*  तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?
- सध्या तरी मी ‘काय रे रास्कला’ वर लक्षकेंद्रित केलं आहे. चित्रपटाला प्रदर्शनानंतर कसा प्रतिसाद मिळतो? याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. यानंतर नक्कीच एखाद्या नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या  भेटीला येईन, हे नक्की. 
Web Title: 'Hard work is not a choice!' - Aishwarya Sonar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.