'Hampi' is a cultural and love heritage! | सांस्कृतिक आणि प्रेमाचा वारसा जपणारं 'हंपी'!


'युनेस्को' नं, 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून जाहीर केलेलं कर्नाटकातील एक अतिशय सुंदर शहर म्हणजे 'हंपी'. शेकडो वर्षांचा दैदिप्यमान इतिहास जपणाऱ्या या शहराची स्वतःची अशी एक खास ओळख आहे.  खरंतर ‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं !’  अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’ या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे. एखाद्या शहराचा एक व्यक्तिमत्त्व म्हणून चित्रपटात झालेला वावर प्रेक्षकांना थेट हंपीला नेईल आणि तिथल्या अतिशय सुंदर लोकेशन्समुळे प्रेक्षक हंपीच्या तर प्रेमात तर पडतीलच पण स्वतःच्याही प्रेमात पडतील. स्वतःला स्वतःच्याच प्रेमात पडायला शिकवणाऱ्या या कलाकृतीची कथा-पटकथा-संवाद, अदिती मोघे यांची असून चित्रपटाचं अप्रतिम दिग्दर्शन केलंय प्रकाश कुंटे यांनी. 'कॉफी आणि बरंच काही', '& जरा हटके', नंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटेची ही नवी कलाकृती म्हणजे अजून एका उच्च अभिरुचीचा नमूना म्हणावा लागेल. शिवाय हंपीतील अप्रतिम लोकेशन्सला फ्रेम मध्ये बसविण्याचं आव्हान सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी यांनी लीलया पेललं आहे.

सध्या, विविध कारणांमुळे एकाकीपणा, नैराश्य आणि ताणतणाव या गोष्टी माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आपलंसं करणारं कुणी तरी हवं असतं. मग ती वेगळेगळ्या वळणावर भेटणारी माणसं असू शकतात किंवा चक्क एखादं ठिकाणही असू शकतं ! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा आशयाच्या हंपी या चित्रपटातील हंपी हे शहर नैराश्यावर चक्क फुंकर मारत राहतं. 'सगळी माणसं वाईटच असतात' असं म्हणणाऱ्या ईशाला (सोनाली कुलकर्णी) हंपी आणि तिथे भेटलेली माणसं बदलवू शकतात का,  हा एक कुतूहलाचा विषय आहे. 

अतिशय सुंदर गाभा असलेल्या या चित्रपटाची निर्मिती  योगेश भालेराव यांच्या ‘स्वरूप समर्थ एंटरटेनमेंट’ आणि अमोल जोशी प्रॉडक्शन, यांची असून ‘स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडीया प्रा. लि.’,आकाश पेंढारकर, सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी बरोबर ललित प्रभाकर,प्राजक्ता माळी,प्रियदर्शन जाधव व छाया कदम यांचाही अतिशय ताकदीचा अभिनय चित्रपटाला ‘हंपी’ इतकच सुंदर करतो.चित्रपटातील गाणी वैभव जोशी आणि ओंकार कुलकर्णी यांनी लिहिली असून  नरेंद्र भिडे आणि आदित्य बेडेकर यांनी संगीत साज चढविला आहे. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या प्रेमात पडायला शिकवणारा हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत आहे  आणि हा चित्रपट बघणे म्हणजे एक अद्भुत अनुभव असणार हे नक्की. 

Web Title: 'Hampi' is a cultural and love heritage!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.