Gangster's role to play in the film Vinit Sharma Dhay | ​विनित शर्मा भय या चित्रपटात साकारणार गँगस्टरची भूमिका

विनित शर्माने मिशन काश्मीर, अशोका द ग्रेट, काल यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. आता विनित शर्मा प्रेक्षकांना एका मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
विनित भय या मराठी चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. कलाकाराने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे असे विनितला वाटते. विनितने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता तो एक वेगळी भूमिका साकारणार आहे. तो प्रेक्षकांना आता गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 
5 जी इंटरनॅशनल प्रस्तुत आणि सचिन कटारनवरे निर्मित भय या चित्रपटात प्रेक्षकांना विनित गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील विनितचा लूकदेखील खूप वेगळा असणार आहे. हा चित्रपट 24 मार्चला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन राहुल भातणकर यांचे आहे. ही भूमिका साकारण्यासाठी विनित खूपच उत्सुक आहे. तो सांगतो, "आजवरच्या माझ्या कारकिर्दीत मला पोलिस इन्स्पेक्टरचाच रोल साकारायला मिळाला आहे. भय या चित्रपटात मी पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मी या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे. माझा जन्म मुंबईतील चेंबुर येथील असल्याने मी गँगस्टरच्या लकबी अगदी जवळून पाहिल्या आहे. याचा वापर मी भयमधील माझी भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी केला आहे. भय या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक वेगळी भूमिका साकारायला मिळाली याचा मला आनंद होत आहे." 
भय या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोकडे, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर, धनंजय मांद्रेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितिन विजय सुपेकर यांचे आहेत. 
Web Title: Gangster's role to play in the film Vinit Sharma Dhay
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.