The first poster of the movie is both an audience audience meeting | ​दोघी या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

दोघी या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पहिल्या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. या पोस्टरमध्ये प्रिया कुर्त्यामध्ये तर मुक्ता साडीमध्ये आपल्याला दिसत आहे. दोघींच्या हातात बर्फाचा गोळा असून त्या दोघी बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत आहेत. या चित्रपटात मुक्ताचा लूक हा खूप वेगळा असणार हे आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरमधूनच कळून येत आहे. या पोस्टमधील फोटोत तिने अतिशय साधी कॉटनची साडी नेसली असून तिचे केस बांधलेले आहेत. तिच्या गळ्यात केवळ काळा दोरा असून कपाळावर मोठाले कुंकू आहे आणि तिने हातात हिरव्या बांगड्या देखील घातल्या आहेत. 
चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट आम्ही दोघी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर आणि सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहीत असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण असलेल्या या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीमध्ये उत्सुकता आहे.
आम्ही दोघी ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टिकोनही ध्यानात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखित होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल आणि त्यांच्या संवेदनशीलतेला स्पर्श करून काही गोष्टींचा विचार करायला भाग पाडेल, असे उद्गार दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना काढले.
प्रतिमा जोशी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तब्बल १० चित्रपटांमध्ये सह-दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या चित्रपटांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता आजचा दिवस माझा या चित्रपटाचा देखील समावेश आहे. आम्ही दोघी या चित्रपटाची पटकथा आणि सवांद भाग्यश्री जाधव यांनी लिहिले आहेत.

Also Read : उमेश कामतला नव्हे तर या गोष्टीला प्रिया बापट करतेय मिस
Web Title: The first poster of the movie is both an audience audience meeting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.