False Imagery of Promotion | प्रमोशनची भन्नाट कल्पना

अमर फोटो स्टुडिओ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी एक भन्नाट कल्पना वापरण्यात आली होती. कोणत्याही नाटकाचे प्रमोशन करण्यासाठी निर्मात्याला खूप सारा पैसा खर्च करावा लागतो. पण अमर फोटो स्टुडिओच्या निर्मात्यांनी अगदी फुकटात त्यांच्या नाटकाचे खूपच चांगले प्रमोशन केले आहे. सध्या सगळीकडेच अमर फोटो स्टुडिओचीच चर्चा आहे. या प्रमोशन फंड्यापुढे आतापर्यंतचे मराठीतील सगळेच प्रमोशन फंडे फिके पडले आहेत. नाटकाच्या काही प्रमोशन फंड्यांवर नजर टाकूया...
अमर फोटो स्टुडिओ ः
गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर अनेक मराठी कलाकार, सामान्य लोक आपले जुने पासपोर्ट साईज फोटो पोस्ट करून त्यासोबत अमर फोटो स्टुडिओ हा हॅशटॅग देत आहेत. सुरुवातीला कोणालाचा हे अमर फोटो स्टुडिओ नावाचे प्रकरण काय आहे ते कळतच नव्हते. अनेकांना तर अमर फोटो स्टुडिओ नावाचा स्टुडिओ असून आपल्या स्टुडिओची कलाकारांमार्फत ते प्रसिद्धी करत आहेत असेच वाटत होते. पण या नावाचे लवकरच नाटक येत असल्याचे या नाटकाच्या टीमने नुकतेच जाहीर केले आणि रसिकांना अमर फोटो स्टुडिओ ही काय गंमत आहे ती कळाली. या नाटकात दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे तसेच सिद्धेश पुरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमेय, सुव्रत आणि सखी यांनी मिळून कलाकारखाना या संस्थेच्या मार्फत या नाटकाची निर्मिती केली आहे. तसेच सुनील बर्वे या नाटकाचा सहनिर्माता आहे. या नाटकाच्या प्रमोशनविषयी अमेय सांगतो, दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका संपल्यानंतर आम्ही कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची त्यांना उत्सुकता लागली होती. आम्ही एका नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येत आहोत हा संदेश आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यासाठी आम्ही ही भन्नाट कल्पना वापरली. आम्ही सुरुवातीला स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि प्रिया बापट या आमच्या तीन मित्रांना आमच्या या कल्पनोविषयी सांगितले आणि त्या तिघांनी सर्वप्रथम फोटो पोस्ट करून आणखी सेलिब्रेटींना फोटो पोस्ट करण्यासाठी आव्हान दिले, अशाप्रकारे याची सुरुवात झाली. केवळ दोनच दिवसांत सगळ्या सेलिब्रेटींमध्ये, सामान्य लोकांमध्ये हा ट्रेंड पोहोचला. हिंदीत काम करणाऱ्या अनेकांनीही त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. आम्ही खूप सारे पैसे जरी दिले असते तरी इतकी जास्त प्रसिद्धी आम्हाला मिळाली नसती. पण या भन्नाट कल्पनेने एकही पैसे न घालवता आम्हाला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ः
आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे या नाटकाच्यावेळी प्रयोगाच्यावेळीही रसिकांना खेचण्यासाठी एक कल्पना वापरण्यात आली होती. प्रत्येक स्त्रीला पैठणी साडी ही खूप आवडते. त्यामुळे प्रयोगाला येणाऱ्या लोकांचा एक लकी ड्रा काढण्यात येत असे आणि काही भाग्यवान महिलांना पैठणी साडी भेटवस्तू म्हणून देण्यात येत असे. यामुळे नाटक पाहायला जाणाऱ्या स्त्रियांची संख्या चांगलीच वाढली होती. 

कार्टी काळजात घुसली ः 
कोणत्याही नाटकाच्या प्रमोशनचे बजेट हे खूपच कमी असते. नाटकांना मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करणे हे परवडतच नाही. पण कार्टी काळजात घुसली या नाटकाच्यावेळी पहिल्यांदाच बस स्थानकावर नाटकाचे मोठे मोठे फ्लेक्स लावण्यात आले होते. प्रशांत दामले या नाटकाच्या आधी काही महिने तरी त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे रंगभूमीपासून दूर होते. त्यामुळे प्रशांत दामले रंगभूमीवर परतत आहेत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी चांगलाच खर्च केला होता. 
 
 
 

Web Title: False Imagery of Promotion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.