अभिनेता स्वप्निल जोशीचा आज वाढदिवस आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे. ट्विटरच्या माध्यमातून तो त्याच्या फॅन्ससोबत आज संवादही साधतोय.स्वप्निलचे बालपण गिरगावात गेले. स्वप्निलच्या घरातील कोणीही या झगमगत्या दुनियेशी संबंधित नसतानाही त्याने आज इंडस्ट्रीत आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.स्वप्निल रामानंद सागर यांच्या कृष्णा या मालिकेमुळे प्रकाशझोतात आला. आजही अनेकजण त्याला कृष्णा म्हणूनच ओळखतात. तो कृष्णाची भूमिका साकारत असताना लोक त्यांच्या लहान मुलांना त्याच्या पाया पडायला सांगत ही गोष्ट त्याला खूपच विचित्र वाटत असे. 
स्वप्निलने हद कर दी, दिल विल प्यार व्यार, देस में निकला होगा चाँद, पापडपोल-शहाबुद्दीन राठोड की रंगीन दुनिया, अमानत यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. हिंदी इंडस्ट्रीतही त्याने आपली छाप पाडली आहे.कॉमेडी सर्कस या प्रसिद्ध कार्यक्रमाचे विजेतेपदही त्याने पटकावले आहे. या कार्यक्रमामुळे त्याची विनोदी छटाही रसिकांना समजली. गुलाम-ए-मुस्तफा या चित्रपटात नाना पाटेकरसोबत तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटातील विक्रम दिक्षित ही त्याने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्याच्या या भूमिकेचे त्यावेळी प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.   


अभिनेता सचिन पिळगांवकर यांना तो त्याचा गुरू मानतो. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. सचिन पिळगांवर स्वप्निलला आपला मुलगाच मानतात.


 स्वप्निल आणि लीनाची पहिली भेट एका कॉफी शॉपमध्ये झाली. व्यवसायाने डेन्टिस्ट असलेल्या लीनासोबत झालेल्या पहिल्या भेटीतच तिच्याशी लग्न करण्याचा स्वप्निलने निर्णय घेतला. लीना आणि स्वप्निलचे लग्न दोघांच्या घरातल्यांनीच ठरवले. स्वप्निलच्या पत्नीचे नाव लीना असून त्या दोघांना मायरा ही मुलगी आहे. स्वप्निल त्याची पत्नी, मुलगी आणि आईवडिलांसोबत मुंबईत राहातो.


 

मराठी इंडस्ट्रीत चॉकलेट हिरो म्हणून स्वप्निलला ओळखले जाते. मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी यांसारख्या अनेक चित्रपटांमुळे त्याची एक रोमँटिक इमेज तयार झाली आहे. त्यामुळे छोटा पडदा तसेच रूपेरी पडदा गाजवणाऱ्या स्वप्निलची रसिकही आतुरतेने वाट पाहात असतात. अशा या चॉकलेट हिरोला cnxmasti.lokmat.com कडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 

 
 

Web Title: Do you know these secrets about Swapnil Joshi?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.