Displaying a 'wedding' song in 'Boys' movie | 'बॉईज' सिनेमातील 'लग्नाळू' गाणे प्रदर्शित

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या 'बॉईज' या आगामी सिनेमाचे नुकतेच 'मी लग्नाळू' हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे; लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित तसेच विशाल देवरुखकर दिग्दर्शित हा सिनेमा कम्प्लीट युथ इंटरटेनिंग असल्याचे समजते.नुकतेच प्रदर्शित झालेले या सिनेमातील 'लग्नाळू' हे गाणे पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात हळूवार फुलणाऱ्या प्रेमभावनेला वाट करून देते. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील गाण्यात रितिका शोत्री ही कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळते. कॉलेजविश्वात पहिलं पाऊल टाकणाऱ्या नवतरुणवर्गाचे विश्व मांडणाऱ्या या गाण्याचे संगीत आणि लिखाण प्रसिद्ध गायक आणि बॉईज सिनेमाचे प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते यांनी केले आहे. शिवाय पार्थ आणि प्रतिकवर आधारित असलेल्या या गाण्याचे बोल कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर यांनी गायले आहे. ह्या गाण्याचे बोल आणि ताल लक्षात घेता हे गाणे बॅचलरपार्टीत जोमात वाजवले जाईल, अशा धाटणीचे आहे. यापूर्वी या सिनेमातील 'जीवना' या गाण्यानेदेखील लोकांच्या मनात अधिराज्य गाजवले असल्याकारणामुळे, हे गाणे देखील प्रेक्षक पसंत करतील अशी अपेक्षा आहे.  
गाण्यांबरोबरच 'बॉईज' सिनेमाचा नवा पोस्टर देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. येत्या ८ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा 'बॉईज' हा सिनेमा, आजच्या 'बॉईज' ना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी ठरणार आहे. यापूर्वी अनेक चित्रपटामधून लोकांसमोर आलेला पार्थ भालेराव यात झळकणार असून सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.या सिनेमाची निर्मिती, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी केली असून, विशाल देवरुखकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. विशेष म्हणजे गायक अवधुत गुप्ते या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कम्प्लीट यूथ एंटरटेनिंग असणाऱ्या या सिनेमाच्या पोस्टरने प्रदर्शनापूर्वीच आजच्या तरुणाईच्या मनात अधिराज्य गाजवले असून, या चित्रपटात चक्क सनी लिओनीचा आयटम नंबर पहायला मिळणार असल्यामुळे, या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सूकता पाहायला मिळतेय.

Web Title: Displaying a 'wedding' song in 'Boys' movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.