Discussion of Adarsh ​​Shinde's Sambhalanga Dhondhang | आदर्श शिंदेच्या संभळंग ढंभळंग या गाण्याची चर्चा

आदर्श शिंदे हे संगीत आणि गायन परंपरा असलेल्या नावाजलेल्या 'शिंदेशाही' कुटुंबातील एक मोठं नाव! आदर्श आपल्या उडत्या चालीच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्याचे वडील प्रसिद्ध पार्श्वगायक, आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे, ज्यास स्वरसम्राट म्हणून आजही ओळखले जाते.
आदर्शच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेले आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेले ‘संभळंग ढंभळंग’ या गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडक्शन्सने केली आहे आणि या गाण्याला अगदी कमी काळात लोकांनी  अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. .या गाण्याची सध्या चांगलीच चर्चा ऐकायला मिळत आहे. ‘टियाना’ हे पुणे स्थित प्रॉडक्शन हाऊस आहे. टियाना’ प्रॉडक्शन्सचे सुजित जाधव या गाण्याला मिळालेल्या प्रतिसादाबाबत प्रचंड खूश आहेत. ते या गाण्याविषयी सांगतात, “आम्ही  युवा आणि महत्वाकांक्षी दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि प्रोड्यूसर्स या नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आमचा पहिला प्रकल्प मराठी संगीत अल्बम ‘प्रीत तुझी’ आहे, जो या महिन्यातच लॉन्च होणार आहे. ‘संभळंग ढंभळंग’ हे ‘प्रीत तुझी’ अल्बम मधील चार गाण्यांपैकी एक गाणे आहे. आमचे बोधवाक्य मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार मनोरंजन तयार करणे हेच आहे. आमचे ‘संभळंग ढंभळंग’ हे गाणे लोकांना खूप आवडत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.”
अनेक मराठी सिनेमांमधून आपण आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे. 'दुनियादारी' या सिनेमातील "देवा तुझ्या गाभाऱ्याला" गाणे असो किंवा 'दगडी चाळ' मधील "मोरया" हे गाणे त्याच्या आवाजाने गाण्याला एक वेगळा साज येतो. ’देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही… या दुनियादारी सिनेमातील गाण्यामुळे आदर्श शिंदेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या गाण्याने त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याला अनेक गाण्यांची ऑफर मिळाल्या. आज मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक गायक असे त्याला मानले जाते. त्याच्या या नव्या अल्बममधील इतर गाणीदेखील प्रेक्षकांना आवडतील अशी सगळ्यांना खात्री आहे. 

Also Read : आदर्श शिंदेचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून चाहत्यांची फसवणूक
Web Title: Discussion of Adarsh ​​Shinde's Sambhalanga Dhondhang
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.