Did you see Ravi Jadhav's Nude film trailer? | ​रवी जाधव यांच्या न्युड या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

रवी जाधव यांचा न्यूड हा चित्रपट चांगलाच वादात अडकला होता. या चित्रपटाचे नाव आणि या चित्रपटाचा विषय यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन न्यूड या चित्रपटाने होणार होते. पण ऐनवेळी चित्रपट निवड समितीच्या सदस्यांनी हा चित्रपट महोत्सवात दाखवायला नकार दिला होता. याबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची नाराजी देखील व्यक्त केली होती. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी ही गोष्ट चुकीची असल्याचे मत देखील व्यक्त केले होते. त्यानंतर एस दुर्गा या महोत्सवातून देखील हा चित्रपट काढून टाकण्यात आला होता. या चित्रपटाला न्याय मिळावा यासाठी रवी जाधव कोर्टात देखील गेले होते. रवी जाधव यांचा हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी रवी जाधव यांना पाठिंबा दिला होता. आता अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून केवळ काही तासांत चार लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. 
काहीही झाले तरी आपल्या मुलाचे शिक्षण थांबू नये यासाठी धडपड करणाऱ्या एका आईची कथा न्यूड या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला नसिरुद्दीन शाह दिसत आहेत. बेटा…. कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही, हा त्यांचा संवाद ऐकूनच आपल्याला चित्रपटाच्या कथेबाबत अंदाज बांधता येत आहे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण देता यावे यासाठी एका कॉलेजमध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका स्त्रीची कथा दिग्दर्शक रवी जाधव यांनी न्यूड या चित्रपटात मांडली आहे. 
न्यूड हा चित्रपट २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून कोणत्याही कट्सविना हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात राजश्री देशपांडेची मुख्य भूमिका असून या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे. अथांश कम्युनिकेशन्स सोबत झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

Also Read : ​'न्यूड' सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘या’ महोत्सवाच्या ओपनिंगला झळकणार
Web Title: Did you see Ravi Jadhav's Nude film trailer?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.