Debut in the direction of singer Anand Shinde in the film Nandu Natwar | ​नंदू नटवरे या चित्रपटाद्वारे गायक आनंद शिंदे यांचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

अनेक गायक अभिनय, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करताना आपल्याला दिसतात. आता आणखी एक गायक दिग्दर्शनाकडे वळला आहे. या गायकाने आजवर मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट गाणी दिली आहेत. ‘जेव्हा नवीन पोपट हा...’ या गाण्यापासून ते अगदी ‘गणपती आला आणि नाचत गेला’ या गाण्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला थिरकवणारे, लाडके महागायक आनंद शिंदे लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. साई इंटरनॅशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तुत ‘नंदू नटवरे’ या सिनेमाचे ते दिग्दर्शन करणार आहेत. हा धम्माल विनोदी चित्रपट असून, त्याच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होत असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच या सिनेमाच्या एका गीताचे जुहू येथील अजीवासन स्टुडियोमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले. या चित्रपटातील लोकगीताच्या रेकोर्डिंगसह या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. हे लोकगीत खुद्द आनंद शिंदे यांनीच गायले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ लावणाऱ्या त्यांच्या गाण्यांमध्ये आता या लोकगीताचीदेखील लवकरच भर पडणार आहे. 
‘नंदू नटवरे’ या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, आनंद शिंदे यांचे सुपुत्र डॉ. उत्कर्ष आनंद शिंदेची या चित्रपटात प्रमुख भूमिका यात असून या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच तो अभिनय क्षेत्रात उतरणार आहे. तसेच आदर्श आणि उत्कर्ष या शिंदे बंधूंचे संगीतदेखील या सिनेमातील गाण्यांना लाभणार असल्याकारणामुळे शिंदेशाही समृद्धीचा सांगीतिक थाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. शिवाय पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या ‘साई अॅग्रो टेक’ या संस्थेअंतर्गत उमेश जाधव, शंभू ओहाळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ निर्मात्याची धुरा सांभाळणार असून अनेक नामवंत कलाकरांची भूमिका या चित्रपटात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत सध्या गुप्तता बाळगण्यात आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर, भोर, मुंबई चित्रनगरीत होणार आहे. हा सिनेमा महागायक आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतील अशी आनंद, आदर्श आणि उत्कर्ष शिंदे यांना खात्री आहे. 

Also Read : आदर्श शिंदेनं गायलं 'विठूमाऊली'चं शीर्षक गीत
Web Title: Debut in the direction of singer Anand Shinde in the film Nandu Natwar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.